वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! केंद्राकडून PUC नियमात मोठा बदल; थेट तुमच्यावर काय परिणाम?
केंद्र सरकारने पीयूसी प्रमाणपत्राच्या वैधतेत बदल केला. सहा वर्षांपर्यंतच्या BS-6 खासगी वाहनांना तीन वर्षांची मुदत देण्यात आलीय. व्यावसायिक आणि जुन्या वाहनांसाठी काय नियम आहेत? जाणून घेऊया.
वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. केंद्र सरकारने वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या म्हणजेच पीयूसी वैधतेच्या नियमांत बदल केलाय. नव्या नियमानुसार, सहा वर्षांपर्यंत जुन्या खासगी BS-6 वाहनांना आता तीन वर्षांसाठी पीयूसी प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे अशा वाहनधारकांना वारंवार प्रदूषण तपासणीसाठी केंद्रावर जाण्याची गरज कमी होईल. असे असले तरी वाहनाचे वय, उत्सर्जन मानक आणि ते खासगी की व्यावसायिक वापरासाठी आहे, यानुसार प्रमाणपत्राची मुदत वेगवेगळी असणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे बदल लागू केले आहेत. नेमके नवे नियम काय आहेत, याचा तुमच्यावर काय परिणाम होणार? सविस्तर जाणून घेऊया. जाणून घ्या.
तीन वर्षांची मुदत
पहिल्या नोंदणीपासून सहा वर्षांपर्यंत जुन्या असलेल्या खासगी BS-6 कार आणि दुचाकींना आता तीन वर्षांसाठी पीयूसी प्रमाणपत्र मिळेल. सहा वर्षांपेक्षा जुनी; पण दहा वर्षांपर्यंतच्या वाहनांसाठी ही मुदत एक वर्ष असेल. दहा वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना दर सहा महिन्यांनी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागेल. म्हणजे वाहनाचे वय वाढेल, तशी प्रदूषण तपासणीची वारंवारताही वाढणार आहे.
व्यावसायिक वाहनांसाठी वेगळी वॅलिडीटी
व्यावसायिक BS-6 वाहनांसाठी सरकारने स्वतंत्र नियम निश्चित केले आहेत. सहा वर्षांपर्यंतच्या व्यावसायिक वाहनांना दोन वर्षांची पीयूसी वॅलिडीटी मिळेल. सहा ते दहा वर्षे वयोगटातील वाहनांसाठी एक वर्ष, तर दहा वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी सहा महिने वॅलिडीटी असणार आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकांनी व्यावसायिक वाहनांचे नियम आपल्या वाहनांना लागू आहेत असे समजू नये.
BS-1 ते BS-4 वाहनांसाठी काय नियम?
जुन्या उत्सर्जन मानकांनुसार तयार झालेल्या वाहनांसाठी प्रमाणपत्राची मुदत कमी ठेवण्यात आली आहे.BS-1, BS-2 आणि BS-3 वाहनांसाठी 3 महिने तर BS-4 वाहनांसाठी 6 महिने मुदत आहे.त्यामुळे जुन्या वाहनधारकांना तुलनेने अधिक वेळा प्रदूषण तपासणी करून घ्यावी लागणार आहे.
जुन्या पीयूसी प्रमाणपत्रांचे काय होणार?
नवीन नियम लागू होण्यापूर्वी जारी केलेली पीयूसी प्रमाणपत्रे तात्काळ बदलली जाणार नाहीत. त्यांचे नवीन नियमांनुसार पहिले रिन्यू करताना सुधारित वॅलिडीटी लागू होईल. त्यामुळे सध्या वैध असलेले प्रमाणपत्र केवळ नियम बदलल्यामुळे रद्द होणार नाही. वाहनधारकांनी प्रमाणपत्रावरील अंतिम तारीख तपासणे महत्त्वाचे असेल, याची वाहनचालकांनी नोंद घ्या.
नूतनीकरणासाठी दहा दिवसांचा नियम
पीयूसी प्रमाणपत्राची मुदत संपण्याच्या आधीच्या दहा दिवसांत नूतनीकरण केल्यास नवीन प्रमाणपत्राची वैधता जुन्या प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर सुरू होणार आहे. असे असले तरी मुदत संपल्यानंतर रिन्यू केल्यास नवीन सर्टीफिकेटची वैधता नूतनीकरणाच्या तारखेपासून सुरू होईल. त्यामुळे प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वीच तपासणी करून घेणे फायदेशीर ठरेल. महाराष्ट्रातील वाहनधारकांनीही अधिकृत पीयूसी केंद्रातून प्रमाणपत्र घेऊन ते वाहनासोबत वैध ठेवणे आवश्यक असणार आहे.