बिस्लेरीच्या गोवा येथील प्रकल्पात तयार झालेल्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या नमुन्यांमध्ये त्रुटी आढळल्यानंतर अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआय विक्रीवर निर्बंध घातले होते. या प्रकरणात कंपनीने आता महत्त्वाची माहिती दिली आहे. एफएसएसएआयची कारवाई संपूर्ण बिस्लेरी ब्रँडवर किंवा गोव्यातील उत्पादन प्रकल्पावर नसून, केवळ एका विशिष्ट बॅचपुरती मर्यादित आहे. संबंधित बॅचचा साठा सध्या बाजारात उपलब्ध नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
एफएसएसएआयने गोव्यातील बिस्लेरीच्या प्रकल्पात तयार झालेल्या ‘GO 270’ या बॅचच्या विक्रीवर बंदी घातली आहे. ही बॅच 27 सप्टेंबर 2025 रोजी तयार करण्यात आली होती. दक्षिण गोव्यातील वर्ना इलेक्ट्रॉनिक सिटी येथील कंपनीच्या प्रकल्पातून नमुना घेण्यात आला होता. तपासणीत एका नमुन्यात त्रुटी आढळली असून कारवाई इतर बॅचवर लागू नाही, असे नियामकाने स्पष्ट केले.
या नमुन्याची सुरुवातीला मुंबईतील एन्व्हायरोकेअर लॅबमध्ये तपासणी करण्यात आली. त्यात ब्रोमेटचे प्रमाण 0.012 मिलिग्रॅम प्रतिलिटर आढळले. निर्धारित मर्यादा 0.01 मिलिग्रॅम प्रतिलिटर आहे. कंपनीने या निष्कर्षाला आव्हान दिल्यानंतर नमुना नवी मुंबईतील नॅशनल फूड लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला.
तपासणीसाठी घेतलेल्या सहा नमुन्यांपैकी सुरुवातीच्या चाचणीत पाच नमुने निर्धारित निकषांनुसार होते. एका नमुन्यात ब्रोमेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले. पुनर्तपासणीत ब्रोमेटचे प्रमाण मर्यादेत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र सहापैकी एका नमुन्यात PAH 0.144 मायक्रोग्रॅम प्रतिलिटर आढळल्याचे कंपनीने मान्य केले आहे. या निष्कर्षांमधील विसंगती दाखवत कंपनीने फेब्रुवारी 2026 मध्ये PAH चाचणी पुन्हा करण्याची मागणी केल्याचे सांगितले.कंपनीने यासंदर्भात माहिती दिली.
‘GO 270’ या बॅचचा साठा सध्या बाजारात उपलब्ध नाही. कंपनी वर्षभरात 50 हजारांहून अधिक बॅच तयार करते. तिचे 143 उत्पादन प्रकल्प सुरू असून, गोव्यातील प्रकल्पाचे कामकाजही बंद करण्यात आलेले नाही. या प्रकल्पातील नंतरच्या उत्पादनांचे नमुने लागू गुणवत्ता निकषांनुसार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
FSSAIची विक्रीबंदी विशिष्ट बॅचपुरती आहे. त्यामुळे ग्राहकांनी बाटलीवरील बॅच क्रमांक आणि उत्पादनाची माहिती तपासणे महत्त्वाचे, असे कंपनीने म्हटलंय. महाराष्ट्रातील ग्राहकांसाठीही हीच खबरदारी लागू आहे. कंपनीने नियामक यंत्रणेला सहकार्य सुरू ठेवणार असल्याचे म्हटले आहे. FSSAIने संबंधित बॅचच्या त्रुटींचे मूळ कारण शोधण्याचे निर्देश कंपनीला दिले आहेत.