मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखाचा एक व्हिडिओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेच्या कुलाबा शाखा प्रमुखाला 50 लाख रुपये दिल्याचा दावा हा व्हिडिओ पोस्ट करत देशपांडे यांनी केला आगे. महापालिका निवडणुकीच्या काळात शाखा प्रमुखाला 50 लाख रुपये देणारा नेता कोण? याची चौकशी करण्याची मागणी संदीप देशपांडे यांनी केलीय. तर या व्हिडिओची सत्यतात पडताळण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे कुलाबा शाखा प्रमुख संतोष पवार यांचा व्हिडिओ ट्विट करत एकच खळबळ उडवून दिलीय. या व्हिडिओमध्ये शाखा प्रमुख दाखवत असलेल्या बॉक्समध्ये 50 लाख रुपये असल्याचंही शाखा प्रमुख या व्हिडिओमधून सांगताना दिसताहेत.. महायुतीच्या वरिष्ठ नेत्याने हा पैशांनी भरलेला बॉक्स दिल्याचा उल्लेख ही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय. यावरूनच संदीप देशपांडे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. हा व्हिडिओ मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळातील आहे. त्यामुळे शाखा प्रमुखाला हे 50 लाख रुपये देणारा नेता कोण असा सवाल करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केलीय.
तर आता एआयच्या माध्यमातून असे अनेक व्हिडिओ येत असतात. देशपांडे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे अशी प्रतिक्रीया संजय शिरसाट यांनी दिलीय. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असं परिवनहमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. सोबतच संदीप देशपांडे यांच्याही चौकशीची मागणी सननाईक यांनी केलीय.
हा व्हिडिओ खरा असेल तर ह्याची चौकशी झाली पाहिजे कोण नेता आहे ज्यांनी ह्या शाखा प्रमुखाला पैसे दिले ? https://t.co/XhYENd2YcO
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 24, 2026
संदीप देशपांडे यांनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांवर शरसंधान साधलंय.. शिंदेंच्या शिवसेनेत असलेले नेते हे विकले जाणारे असल्याचं म्हणत राऊतांनी निशाणा साधलाय.
तर या व्हिडिओवरून भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वात जास्त पैशांचा वापर केल्याचं म्हणत नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर प्रतिहल्ला चढवलाय.
संदीप देशपांडे यांनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला एवढी मोठी रक्कम देणारा नेता कोण असा सवाल उपस्थित झालाय. शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही या व्हिडओच्या सत्यतेची आणि प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय... त्यामुळे शिवसेनेचे कुलाब्याचे शाखा प्रमुख संतोष पवार या व्हिडिओसंदर्भात खुलासा करणार का? त्यांना पैसे देणारा नेता कोण याचं नाव सांगणार का? की एवढ्या मोठ्या रकमेसंदर्भात चौकशी केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे..