मुंबईकरांनो, 'या' भागात फटाके फोडाल तर दिवाळी जाईल तुरुंगात; 2 डिसेंबरपर्यंत आदेश लागू!
मुंबईतील माहुल परिसरात बीपीसीएल आणि एचपीसीएल रिफायनरीजच्या सुरक्षेसाठी फटाके आणि आतषबाजीवर 2 डिसेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. कोणत्या भागात निर्बंध आहेत, जाणून घेऊया.
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलाय. मुंबईसह देशभरात दिव्यांच्या रोषणाईने शहरं उजळून निघत आहेत. फटाक्यांची खरेदीदेखील मोठ्या प्रमाणात होतेय. पण मुंबईकरांनी फटाके फोडताना थोडी काळजी घेण्याची गरज आहे. कारण मुंबईतील काही भागात तुम्हाला फटाके फोडता येणार नाहीयत. दिवाळी
जवळ येत असताना मुंबई पोलिसांनी माहुल परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. काय आहे निर्णय? याचा मुंबईकरांवर काय परिणाम होणार? सविस्तर जाणून घेऊया.
चेंबूरमधील माहुल येथे असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांच्या रिफायनरी आणि बॉटलिंग प्लांटच्या सुरक्षेच्या दृष्टीने फटाके फोडण्यास आणि आतषबाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश 3 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2026 या कालावधीत लागू राहणार आहे. दोन्ही तारखांचा या कालावधीत समावेश आहे.
फटाके आणि रॉकेट उडवता येणार नाहीत
पोलीस उपायुक्त (ऑपरेशन्स) आणि कार्यकारी दंडाधिकारी अकबर पठाण यांनी हा आदेश जारी केला आहे. संबंधित बॉटलिंग प्लांटच्या बफर झोनच्या पुढील 500 मीटर परिसरात कोणालाही फटाके फोडता येणार नाहीत. तसेच रॉकेट किंवा अन्य प्रकारची आतषबाजी करण्यासही मनाई करण्यात आली आहे. पेट्रोलियम पदार्थांचा साठा आणि प्रक्रिया होत असलेल्या संवेदनशील औद्योगिक परिसरात आगीचा धोका टाळणे हा या निर्बंधांमागील प्रमुख उद्देश आहे.
कोणते भाग प्रतिबंधित क्षेत्रात?
मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार पुढील परिसरात निर्बंध लागू असतील. बीपीसीएल आणि एचपीसीएल रिफायनरीचा बाहेरील परिघ,माहुल टर्मिनल परिसर, बीपीसीएलच्या बीडीयू प्लांटचा परिसर, एचपीसीएल च्या बीडीयू प्लांटचा परिसर, 15 आणि 50 एकर क्षेत्राच्या मागील भागापासून स्पेशल ऑइल रिफायनरीपर्यंतचा परिसर. त्यामुळे माहुलमधील नागरिकांनी आणि या औद्योगिक क्षेत्रात कामासाठी येणाऱ्यांनी फटाके फोडण्यापूर्वी प्रतिबंधित क्षेत्राची माहिती घ्यावी.
सार्वजनिक ठिकाणी जनजागृती
निर्बंधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी आदेशाच्या प्रती लावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच लाउडस्पीकर आणि मेगाफोनच्या माध्यमातूनही या नियमांची माहिती देण्यात येणार आहे. संबंधित भागातील नागरिक, दुकानदार आणि व्यावसायिकांनी या आदेशाचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपूर्ण मुंबईत बंदी आहे का?
माहुलमधील बंदी ही बीपीसीएल आणि एचपीसीएलच्या संवेदनशील औद्योगिक परिसराभोवती लागू करण्यात आलेली स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था आहे. संपूर्ण मुंबईत घराच्या आवारात फटाके फोडण्यावर याच आदेशाने बंदी घातलेली नाही. असे असले तरी मुंबई पोलिसांनी यापूर्वीच शहरातील सार्वजनिक रस्ते आणि रस्त्यांवरील फटाक्यांवर 4 डिसेंबरपर्यंत स्वतंत्र निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक परिसरातील नियम तपासूनच फटाके फोडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.