18000 पैकी फक्त 14 विद्यार्थी NEET-JEE परीक्षेत उत्तीर्ण झाले! राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शिक्षण व्यवस्थेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 18000 पैकी फक्त 14 विद्यार्थी NEET-JEE परीक्षेत उत्तीर्ण झाले ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.
राज्यपाल हरिभाऊ बागडे : सध्या देशभरात NEET-JEE परीक्षेवरुन मोठा गोंधळ सुरु आहे. अशातच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नीट आणि जेईई सारख्या स्पर्धा परीक्षांच्या निकालांचा हवाला देत तयांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. अलवर जिल्ह्यातील अंदाजे 18,000 विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिल्या, परंतु त्यापैकी फक्त 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आकडेवारी अत्यंत धक्कादायक असून शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठकीत राज्यपालांनी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींबाबत चिंता व्यक्त केली. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा स्तर सुधारण्याची गरज आहे. शिक्षणातील यश केवळ विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण करण्यापुरते मर्यादित नाही. मुलांमध्ये बौद्धिक क्षमता, विवेकबुद्धी आणि तार्किक विचारशक्ती विकसित करणे हेदेखील महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची नैसर्गिक जिज्ञासा असते. मुलांच्या या जिज्ञासेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ही शिक्षकांची जबाबदारी आहे. फक्त उत्तीर्ण होणे हे शिक्षणाचे ध्येय नसावे. शालेय शिक्षणासह विद्यार्थ्यांना नीट-जेईई, आरपीएससी आणि यूपीएससी यांसारख्या आव्हानात्मक स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी तयार करुन घेणे गरजेचे आहे.
पदवी असली तरी तररुण आरपीएससी-यूपीएससीसाठी पात्र का होत नाहीत?
विद्यार्थी पदवी मिळवतात पण ते आरपीएससी आणि यूपीएससी परीक्षा देण्यास इच्छुक नसतात. यावरुनच पदवी मिळवणे आणि प्रत्यक्ष शैक्षणिक क्षमता यांच्यातील फरक दिसून येतो. शिक्षणाची वास्तविक स्थिती समजून घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण विभागाने दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थ्यांमधील प्रतिभा विकसित करण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे अशा सूचना त्यांनी केल्या.