धक्कादायक! सूरतमध्ये महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील 6 जणांना कालव्यात फेकून दिलं; दोन लहान मुलांचा समावेश
हे कुटुंब जळगावचं राहणार असून, एका फॅक्टरीत मजूर म्हणून काम करतात. 21 नोव्हेंबरला हे कुटुंब कामाच्या शोधात सूरतला निघालं होतं.
सूरतमध्ये एका संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ हा क्रूर आणि संतापजनक घटना घडली आहे. हे कुटुंब मजूर म्हणून काम करत होतं. महुआजवळील कालव्यातून कुटुंबातील तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, ज्यामध्ये आई-वडिलांचाही समावेश आहे. दरम्यान 13 वर्षांचा एक मुलगा वाचला आहे. इतर दोन मुलं बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. हे कुटुंब महाराष्ट्रातील जळगावचं आहे.
सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे घटना घडली आहे. जळगावमध्ये वास्तव्यास असणारं कुटुंब प्रवास करत होतं. कुटुंबातील वडील एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कारखान्यात मजूर म्हणून काम करत होते. कामाच्या शोधात 21 नोव्हेंबरला ते कुटुंबीयांसह सूरतच्या दिशेने निघाले होते. बारडोलीतील उवा कालव्याजवळ त्यांची गाडी पोहोचताच दुसऱ्या एका कारमधून आलेल्या चार व्यक्तींनी त्यांच्या गाडी समोर आडवी घालत त्यांना अडवलं.
आरोपींनी कुटुंबातील सदस्यांना बळजबरीने त्यांच्या वाहनातून बाहेर काढलं आणि कालव्याच्या खोल पाण्यात फेकून दिलं. दरम्यान त्यांच्यातील 13 वर्षीय मुलाने कालव्याच्या आत बसवलेल्या एका पाईपला घट्ट पकडून ठेवल्यामुळे, चमत्कारिकरीत्या वाचला. स्वतःचा जीव वाचवून कालव्यातून बाहेर पडल्यानंतर, तो मुलगा जवळच्या एका हॉटेलमध्ये पोहोचला, तिथे त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि पोलिसांशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम राबवली. यादरम्यान, महुवा तालुक्यातील डुंगरीजवळ कालव्याच्या पाण्यात तीन मृतदेह सापडले. मृतांमध्ये एक पुरुष, एक स्त्री आणि एका तरुणीचा समावेश आहे. नातेवाईकांनी या मृतदेहांची ओळख पटवली असून, पुरुष नितीन (उर्फ भुरिया) पाटील आणि महिला कविता पाटील असल्याचं स्पष्ट झालं आहे. तपासातून समोर आलं आहे की, कविता पाटील यांच्या पहिल्या पतीच्या निधनानंतर त्या नितीन पाटील याच्यासोबत राहत होत्या.
दरम्यान प्रथमेश पाटील आणि हरीश संजय पाटील ही दोन मुलं अद्यापही बेपत्ता आहेत. अग्निशमन दल आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान संपूर्ण कुटुंबालाच संपवण्याचा प्रयत्न का करण्यात आला याची माहिती पोलीस घेत असून तपास करत आहेत. आरोपी संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकून दिल्यानंतर फरार झाले आहेत.
बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात खंडियो, अभो, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य पाहता, सुरत ग्रामीण पोलिसांना हा हत्येचा प्रकार असल्याचा संशय आहे. या घटनेमागचे सत्य शोधून काढण्यासाठी, गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि बेपत्ता असलेल्या दोन मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आठ स्वतंत्र पथके तयार केली असून, सखोल तपास सुरू केला आहे.