कायद्याने बंदी हुंडा मागण्याचे प्रकार आजही लपूनछपून किंवा उघडपणे सुरु आहेत. त्यामुळे अनेकदा परिस्थिती नसली तरी वधू पक्षाकडून कर्ज काढून हुंडा दिला जातो. याऊलट एक प्रकार समोर आलाय. जिथे वधू पक्षाकडून वर पक्षाला अशी अद्दल घडवण्यात आली की सारेजण पाहतच राहिले. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
लग्न ठरलं, साखरपुडा झाला आणि विवाहाच्या तयारीलाही सुरुवात झाली. मात्र, लग्नाआधी वरपक्षाकडून महागड्या थार गाडीची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर संतापलेल्या मुलीच्या वडिलांनी असा काही निर्णय घेतला की, संपूर्ण प्रकरणाची चर्चा सुरू झाली. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मुलीच्या कुटुंबीयांनी वरपक्षाला चक्क खेळण्यातील प्लास्टिकची थार गाडी दिली आणि लग्न मोडल्याचे जाहीर केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मेरठमधील ज्ञानपूर गावातील शमशेर यांच्या मुलाचे लग्न परतापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोलाना गावातील बब्बर यांच्या मुलीसोबत ठरले होते. सुमारे पाच महिन्यांपूर्वी दोन्ही कुटुंबांनी या लग्नाला संमती दिली होती. साखरपुड्याच्या वेळी मुलीच्या कुटुंबीयांनी एक लाख रुपये आणि अन्य भेटवस्तू दिली.
उत्तर प्रदेश – मेरठ में शादी से ठीक पहले दूल्हे ने थार मांगी तो लड़की पक्ष ने प्लास्टिक खिलौना वाली थार पकड़ाकर ये रिश्ता तोड़ दिया !! https://t.co/46M8NgVN4t
— Sachin Gupta (@Sachingupta) November 29, 2026
मुलीचे वडील बब्बर यांनी काही काळापूर्वी आपली जमीन विकली होती. या व्यवहाराची माहिती वरपक्षाला मिळाल्यानंतर त्यांनी हुंड्यात महिंद्रा थार गाडीची मागणी केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केलाय. मुलीच्या वडिलांनी ही मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगूनही वरपक्षाकडून आग्रह सुरू होता.
शनिवारी लग्नाची तारीख निश्चित करण्याशी संबंधित लाल खत या पारंपरिक कार्यक्रमासाठी वरपक्ष मुलीच्या घरी पोहोचला होता. वरपक्षातील सदस्य सकाळपासून मुलीच्या घरी थांबले होते. रात्रीपर्यंत थार गाडीची मागणी पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी वेगळाच निर्णय घेतला.
रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास मुलीच्या कुटुंबीयांनी वराच्या वडिलांच्या हातात प्लास्टिकची खेळण्यातील थार गाडी दिली. 'तुम्हाला मुलगी नको, गाडी हवी होती,' अशा आशयाचे वक्तव्य मुलीच्या वडिलांनी व्हिडीओमध्ये केले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
खेळण्यातील गाडी दिल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी लग्न रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. साखरपुडाही मोडला. मुलीनेही अशा कुटुंबात लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. दरम्यान, हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार लग्नाच्या संदर्भात हुंड्याची मागणी करणे हा दंडनीय गुन्हा आहे. कायद्याच्या कलम 4 नुसार दोष सिद्ध झाल्यास सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कारावास आणि दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे हुंड्याच्या मागणीला विरोध करणे आणि अशा प्रकरणांची कायदेशीर तक्रार करणे महत्त्वाचे आहे.