नरक चतुर्दशी - लक्ष्मीपूजन एकाच दिवशी! अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय?
नरक चतुर्दशी - लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्यामुळे अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्तासह धार्मिक विधी सगळं काही एका क्लिकवर जाणून घ्या.
पंचांगातील तिथींच्या गणितानुसार यंदा दिवाळीत एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. रविवार, 8 नोव्हेंबर 2026 रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले असून, महाराष्ट्रातील पंचांगानुसार भाविकांना एकाच दिवशी पहाटे अभ्यंगस्नान आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजनाचे सर्व धार्मिक विधी पार पाडावे लागणार आहेत.
नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी का?
हिंदू पंचांगानुसार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:४७ वाजता कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी सुरू होत असून, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:२७ वाजता संपणार आहे. त्यानंतर अमावस्या तिथी सुरू होईल. नियमानुसार नरक चतुर्दशीचे अभ्यंगस्नान सूर्योदयापूर्वी चतुर्दशी तिथी असताना केले जाते, तर लक्ष्मीपूजन अमावस्या तिथीच्या प्रदोषकाळात केले जाते. त्यामुळे यंदा हे दोन्ही प्रमुख सण एकाच दिवशी आले आहेत.
८ नोव्हेंबर २०२६: दिवसभरातील पूजा आणि शुभ मुहूर्त
अभ्यंगस्नानाचा मुहूर्त:
वेळ: पहाटे ५:४५ ते सकाळी ६:४२ (सूर्योदय सकाळी ६:४२)
विधी: सूर्योदयापूर्वी अंगाला तेल आणि उटणे लावून स्नान करावे. या स्नानामुळे पापांचा नाश होऊन शरीर व मनाची शुद्धी होते. स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवदर्शन घ्यावे.
नरक चतुर्दशी पूजा व यमदीपदान:
विधी: भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्याच्या स्मरणार्थ ही पूजा केली जाते. सकाळी देवघरात दिवा लावून श्रीकृष्णाची पूजा करावी, फुले व नैवेद्य अर्पण करावा. तसेच संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वाराजवळ दक्षिण दिशेला दिवा लावून यमदेवाला प्रार्थना (यमदीपदान) करावी.
लक्ष्मीपूजनाचा मुख्य शुभ मुहूर्त:
वेळ: संध्याकाळी ६:२७ ते रात्री ८:२७
प्रदोषकाळ: संध्याकाळी ६:०२ ते रात्री ८:३४
वृषभ स्थिर लग्न: संध्याकाळी ६:२७ ते रात्री ८:२७
अमावस्या तिथी प्रारंभ: सकाळी ११:२७ नंतर
सकाळपासून रात्रीपर्यंतचे पूजेचे नियोजन
पहाटे ५:४५ ते ६:४२: अभ्यंगस्नान (तेल-उटणे लावून पवित्र स्नान).
सकाळी ६:४२ नंतर: नरक चतुर्दशीची पूजा आणि श्रीकृष्णाचे स्मरण.
सकाळ ते दुपार: घराची स्वच्छता, दारावर सुंदर रांगोळी, फुलांची सजावट आणि लक्ष्मीपूजनाची तयारी.
संध्याकाळी ६:०२ नंतर: घराचे देवघर, प्रवेशद्वार आणि अंगणात पणत्या व दिवे प्रज्वलित करणे.
संध्याकाळी ६:२७ ते रात्री ८:२७: शुभ मुहूर्तावर गणेश, लक्ष्मी आणि सरस्वतीची विधिवत पूजा आणि आरती.