क्रिकेटर मोहम्मद शमी निवडणूक लढवणार? BJP अध्यक्षांची घेतली भेट
Mohammad Shami : मोहम्मद शमी राजकारणाच्या मैदानात त्याची दुसरी इनिंग सुरु करतोय अशी चर्चा आता रंगलीये. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितिन नबीन यांची मोहम्मद शमीने भेट घेतली.
Mohammad Shami : भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला मागील अनेक वर्षांपासून टीम इंडियात संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता मोहम्मद शमीचं करिअर जवळपास संपल्याचं बोललं जातं आहे. अशातच मोहम्मद शमी राजकारणाच्या मैदानात त्याची दुसरी इनिंग सुरु करतोय अशी चर्चा आता रंगलीये. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितिन नबीन यांची मोहम्मद शमीने भेट घेतली. या भेटीचा फोटो समोर येताच विविध चर्चांना उधाण आलं आहे.
उत्तरप्रदेश निवडणुकीच्या आधी घेतली भेट :
भारतीय स्टार क्रिकेटपटू मोहम्मद शमीने रविवारी 29 नोव्हेंबर रोजी भाजप अध्यक्ष नितीन नबिन यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो समोर येताच, शमीच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या शक्यतेबाबत चर्चा सुरू झाली. या तर्कवितर्कांना आणखी एक कारण म्हणजे, यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष बासित अली हे देखील शमीसोबत उपस्थित होते. नबिन आणि शमी यांच्यातील ही भेट नेमकी कुठे किंवा कोणत्या कारणासाठी झाली. याबद्दल दोन्ही बाजूंनी कोणतीही अधिक माहिती दिलेली नाही.
शमी आणि नबिन यांच्यातील या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. कारण ही भेट उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर झाली आहे, जी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात नियोजित आहे. शमी पश्चिम उत्तर प्रदेशातील अमरोहा शहराचा रहिवासी आहे. त्यामुळे तो या भागातून भाजपचा उमेदवार असू शकतो, अशी चर्चा होणे स्वाभाविक आहे. मात्र या भेटीच्या कारणाबाबत शमी किंवा भाजप यांपैकी कोणीही अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.