भारताला अंडर-19 आशिया कपमध्ये चॅम्पियन बनवणाऱ्या मोहित उल्वाला लागली लॉटरी, वरिष्ठ संघात मिळाली संधी
U19 Asia Cup 2026 : सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी आपल्या संघात मोहित उल्वाचा समावेश करण्यात आला आहे. मोहितने नुकत्याच झालेल्या अंडर 19 आशिया कप 2026 मध्ये भारताला शेवटच्या बॉलवर चौकार मारून सामना जिंकवून दिला होता.
U19 Asia Cup 2026 : अंडर 19 आशिया कप 2026 च्या फायनलमध्ये भारताला शेवटच्या बॉलवर चौकार मारून जिंकवून देणाऱ्या मोहित उल्वाला आता वरिष्ठ संघाची लॉटरी लागली आहे. 18 वर्षांचा हा खेळाडू आपल्या दमदार प्रदर्शनामुळे सध्या खूपच चर्चेत आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी आपल्या संघाचा मोहित उल्वाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहित उल्वाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पदार्पण होणं ही त्याच्यासाठी एक खूप चांगली गोष्ट आहे.
मोहितच्या उत्कृष्ट कामगिरीच्या पार्श्वभूमीवर त्याला थेट वरिष्ठ संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शहा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की मोहितला इंदूरला पोहोचून संघात सामील होण्यास सांगण्यात आले आहे, जिथे सौराष्ट्रचा संघ सध्या स्पर्धेतील सामने खेळत आहे. तरुण खेळाडूचे कौतुक करताना शहा यांनी म्हटले की, कठीण परिस्थितीत त्याने दाखवलेली जिद्द आणि दृढनिश्चय खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. मोहित भविष्यात वरिष्ठ संघासाठीही एक मौल्यवान खेळाडू ठरेल, असा विश्वास संघटनेला वाटतो.
शेवटच्या बॉलवर जिंकला सामना :
मोहित उल्वाने अंडर 19 आशिया कपच्या फायनलमध्ये जे केलं ते अनेक भारतीय क्रिकेट फॅन्स विसरू शकणार नाहीत. पाकिस्तानविरुद्ध 338 धावांचे कठीण लक्ष्य गाठताना, भारतीय संघ एका टप्प्यावर अत्यंत कठीण परिस्थितीत सापडला होता. 252 धावांत आठ विकेट गेल्यामुळे पराभव जवळजवळ निश्चित वाटत होता. अशा वेळी दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोहितने सामन्याचे पारडे पूर्णपणे फिरवून टाकले.
हेही वाचा : IND vs NZ सामन्यादरम्यान मोहम्मद सिराज इशान किशनवर संतापला, नक्की झाले काय?
18 वर्षांचा आहे मोहित उल्वा :
मोहित उल्वा हा फक्त 18 वर्षांचा असून तो गुजरातच्या सुरेंद्रनगर येथे राहणारा आहे. तो सध्या राजकोट येथे राहतो. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या या खेळाडूने आपल्या कामगिरीद्वारे हे सिद्ध केले आहे की, मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी वय हा कोणताही अडथळा नसतो. अंतिम सामना जिंकल्यानंतर, मोहितने आपल्या यशाचे श्रेय संघाकडून आणि मुख्य प्रशिक्षकाकडून मिळालेल्या विश्वासाला दिले. त्याने सांगितले की त्याला स्वतःवरही विश्वास होता आणि फटके मारण्यापूर्वी त्याचे पूर्ण लक्ष केवळ बॉलवर होते.