'विराट कोहलीला 10 वर्षांनी पश्चात्ताप होईल!', कपिल देव यांनी का दिला इशारा?
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन मोठी चूक केली, असे कपिल देव म्हणाले. दहा वर्षांनी पश्चात्ताप होईल, असा इशाराही त्यांनी दिला. कपिल देव असं का म्हणाले? सविस्तर जाणून घेऊया.
भारताचे माजी कर्णधार आणि 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे नेतृत्व करणारे कपिल देव यांनी विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयावर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केलीय. कोहलीने कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घाईत घेतला, असे मत कपिल देव यांनी व्यक्त केलंय. त्याच्या फिटनेसचा दाखला देत तो आणखी काही वर्षे कसोटी क्रिकेट खेळू शकला असता, असेही त्यांनी म्हटलंय. एवढेच नव्हे तर दहा वर्षांनंतर कोहलीला आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप होऊ शकतो, असे भाकीतही त्यांनी केले आहे. नेमकं काय म्हणाले कपिल देव? त्यांनी असं का म्हटलं? सविस्तर जाणून घेऊया.
'कोहलीने कारकिर्दीतील सर्वात मोठी चूक केली'
'मिड-डे'ला दिलेल्या मुलाखतीत कपिल देव यांनी विराटच्या निवृत्तीवर भाष्य केले. 'मला वाटते विराट कोहलीने सर्वात मोठी चूक केली. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दहा वर्षांनंतर त्याला या निर्णयाचा पश्चात्ताप होईल,' असे कपिल देव यांनी म्हटले. कोहलीसारख्या अनुभवी आणि प्रतिभावान फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी योगदान द्यायला हवे होते, असेही कपिल यांचे मत आहे.
'फिटनेसच्या जोरावर आणखी खेळू शकला असता'
कपिल देव यांनी कोहलीच्या फिटनेसचे विशेष कौतुक केले. कोहलीची शारीरिक क्षमता अनेक युवा क्रिकेटपटूंनाही आव्हान देऊ शकते. वय आणि फिटनेस लक्षात घेता त्याच्याकडे कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची क्षमता अजूनही होती. त्यामुळे केवळ कठीण काळ किंवा नाराजीमुळे निवृत्ती घेणे योग्य नाही, असे कपिल यांनी सुचवले.
मोहिंदर अमरनाथ यांचे दिले उदाहरण
आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ कपिल देव यांनी माजी भारतीय क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांचे उदाहरण दिले. अमरनाथ यांना अनेकदा संघातून वगळण्यात आले; मात्र त्यांनी हार न मानता पुन्हा मेहनत केली आणि टीममध्ये पुनरागमन केले. खेळाडूंनी अडचणींचा सामना करून स्वतःला सिद्ध करायला हवे, असा संदेश कपिल यांनी या उदाहरणातून दिला. निवृत्ती हा प्रत्येक खेळाडूचा वैयक्तिक निर्णय असला, तरी संधी संपण्यापूर्वी मैदान सोडू नये, असे त्यांचे म्हणणे आहे.
12 मे 2025 रोजी कोहलीची निवृत्ती
विराट कोहलीने 12 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने भारतासाठी 123 कसोटी सामने खेळले आणि 9230 धावा केल्या. त्याच्या नावावर 30 शतके आणि 31 अर्धशतके आहेत. कसोटी क्रिकेटमधील त्याची सरासरी 46.85 होती. त्याने जानेवारी 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे शेवटचा कसोटी सामना खेळला. कसोटीमधून निवृत्तीपूर्वी त्याने 2024े मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही अलविदा केला होता.
आता कोहलीकडून काय अपेक्षा?
कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर कोहली भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळतोय. त्याच्या फिटनेस आणि फलंदाजीतील सातत्यामुळे तो आणखी काही वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये योगदान देऊ शकतो, अशी अपेक्षा अनेक माजी क्रिकेटपटू व्यक्त करतायत.