प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेत आता 'या' वेळेत फोन, लॅपटॉप चार्जिंग करता येणार नाही
रेल्वेत रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत चार्जिंग बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे बोलले जातेय.
लांबचा रेल्वे प्रवास असेल तेव्हा अनेकजण ट्रेनमध्ये देण्यात आलेल्या चार्जिंग पोर्टलाच फोन चार्जिंगसाठी लावतात. पण आता तुम्हाला एका ठराविक वेळेपर्यंतच रेल्वे प्रवासात फोन चार्जिंग करता येणार आहे.
रेल्वे प्रवासात आता रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत मोबाइल आणि लॅपटॉप चार्जिंग करता येणार नाही. आग लागण्याचा धोका टाळण्यासाठी चार्जिंगची विद्युत जोडणी बंद ठेवणे बंधनकारक असल्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने पुन्हा जारी केले आहेत. 2014 मध्ये जारी केलेल्या या आदेशाची सर्व रेल्वे विभागांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
दक्षिण पूर्व रेल्वे विभागात नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर बोर्डाने हे निर्देश दिले आहेत. संबंधित वेळेत डब्यातील चार्जिंगची जोडणी बंद करण्यात आली नव्हती. त्यादरम्यान एका प्रवाशाची पॉवर बँक चार्जिंग करताना फुटली आणि त्यातून धूर निघाला. या घटनेची दखल घेत रेल्वे बोर्डाने 26 ऑक्टोबर रोजी सर्व विभागांना पत्र पाठवले आहे
रेल्वेतील चार्जिंगची जोडणी ठरवून दिलेल्या वेळेत बंद राहील, याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर असेल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच, वरिष्ठ अधिकारी आणि पर्यवेक्षकांनी अचानक तपासण्या कराव्यात, असे बोर्डाने म्हटले आहे.
2014मध्येही घेतलेला निर्णय
2014 मध्येही पहिल्यांदा असा निर्णय घेण्यात आला होता. रेल्वे बोर्डाने जून 2014 मध्ये पहिल्यांदा रेल्वेतील विद्युत जोडणी रात्रीच्या वेळी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. 2013 मध्ये हजूर साहिब नांदेड-केएसआर बंगळुरू एक्स्प्रेसच्या वातानुकूलित तृतीय श्रेणीच्या डब्यात आग लागली होती. या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी चार्जिंगसाठी असलेली विद्युत जोडणी रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत बंद ठेवण्याची शिफारस केली होती. मात्र, प्रवाशांची सोय लक्षात घेत रेल्वे बोर्डाने रात्री 11 ते पहाटे 5 ही वेळ ठरवली आहे.