टाटाची कार खरेदी करणार असाल तर आताच घ्या! 1 डिसेंबरपासून वाढणार किंमती; कार, इलेक्ट्रिक, SUV सर्वकाही महागणार
टाटा मोटर्सने 1 डिसेंबर 2026 पासून आपल्या सर्व कार, एसयुव्ही आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
जर तुम्ही आगामी दिवसात टाटा मोटर्सची कार किंवा एसयुव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. याचं कारण कंपनी 1 डिसेंबर 2026 पासून आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ करणार आहे. यामध्ये पेट्रोल-डिझेलसह इलेक्ट्रिक वाहनांचाही समावेश आहे.
Tata Motors Passenger Vehicles Ltd. ने 24 नोव्हेंबरला यासंदर्भात घोषणा केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वाहनांच्या किंमतीत जवळपास 0.5 टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. वाहनांचे मॉडेल आणि व्हेरिएंटनुसारही ही वाढ केली जाणार आहे.
किंमती वाढवण्याचं कारण काय?
कंपनीने सांगितलं आहे की, वाहन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आणि इतर घटकांच्या किमती सतत वाढत आहेत. या वाढत्या खर्चाचा परिणाम काही प्रमाणात भरून काढण्यासाठी किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने असंही स्पष्ट केले आहे की, वाढलेल्या खर्चाचा मोठा भाग कंपनी स्वतः उचलत असून, काही भार ग्राहकांवर टाकणं आवश्यक झालं आहे. किमतींमधील ही वाढ कंपनीच्या सर्व प्रकारच्या कार आणि एसयूव्ही (SUV) वाहनांना लागू होईल.
कोणत्या वाहनांच्या किंमतीत होणार वाढ?
Tata Motors Passenger Vehicles Ltd. ने स्पष्ट केलं आहे की, किमतींमधील ही वाढ कंपनीच्या सर्व प्रवासी वाहनांना लागू होईल. याचा अर्थ असा की, लहान हॅचबॅकपासून ते लोकप्रिय एसयूव्ही (SUV) आणि सर्व इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत सर्वांच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे, जर तुम्ही नवीन टाटा कार किंवा एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 1 डिसेंबरपूर्वी खरेदी करणं तुमच्या खिशाला फायदा देणारं ठरेल.
खिशावर किती भार पडणार?
गाडीची किंमत नेमकी किती वाढणार हे आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊयात. समजा जर तुम्ही 10 लाखांची कार खरेदी केली तर 0.5 टक्क्यांनुसार जवळपास 5 हजार रुपये जास्त भरावे लागणार आहेत. तसंच 20 लाखांची कार, एसयुव्ही किंवा इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यास 10 हजारांचं अतिरिक्त ओझं पडेल. टाटाने आपल्या मॉडेलनुसार, वाढलेल्या किंमती अधिकृतपणे जाहीर करेल तेव्हा जास्त स्पष्टता मिळेल.