महिना ₹1 लाख 60 हजार पगार, राहण्यासाठी रुम अन्... IIT मुंबईमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज करायची शेवटची तारीख, पात्रतेसहीत इतर तपशील
मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पवईमधील आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध असून यासंदर्भातील माहिती आयआयटी प्रशासनानेच जारी केली आहे. या ठिकाणी 30 पदं भरली जाणार आहेत. जाणून घ्या यासंदर्भातील सविस्तर तपशील...
आयआयटी मुंबईने एक मोठा निर्णय घेतला आहे. मागील महिन्यामध्ये येथील विद्यार्थी साहिल वाकोडेने आत्महत्या केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आयआयटी प्रशासन पुरेशी काळजी घेत नसल्याचे आरोप करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता आयआयटी मुंबई प्रशासनाने विद्यार्थी कल्याण केंद्रामार्फत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी समुपदेशकांच्या भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. विद्यार्थ्यांना भावनिक आणि मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशकांची आयआयटी मुंबई नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये 26 समुपदेशक आणि चार वरिष्ठ समुपदेशकांचा समावेश असणार आहे. या भरतीसाठी 12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मुलाखती होणार आहेत.
उद्देश काय?
पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भावनिक, मानसिक आणि एकूणच कल्याण साधणे, हा या केंद्राचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गरजेनुसार पुढील मदत आणि उपचारांसंदर्भतील सेवा देण्याची जबाबदारीही नव्याने नियुक्त होणाऱ्या समुपदेशकांवर असेल.
अनुभवी उमेदवारांना संधी
समुपदेशक पदासाठी मानसशास्वातील पदव्युत्तर पदवी आवश्यक असून, त्यामध्ये किमान 55 टक्के गुण मिळवलेले असणे बंधनकारक आहे. संबंधित पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची असावी. समुपदेशक पदासाठी पदव्युत्तर पदवीनंतर शैक्षणिक किंवा वैद्यकीय संस्थेतील किमान दोन वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक आहे. तर वरिष्ठ समुपदेशक पदासाठी किमान दहा वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
मानधन किती?
पूर्णवेळ समुपदेशकांना अनुभवानुसार दरमहा 70 हजार ते एक लाख रुपये, तर वरिष्ठ समुपदेशकांना एक लाख 40 हजार ते एक लाख 60 हजार रुपये मानधन मिळणार आहे. अर्धवेळ कामासाठी समुपदेशकांना अनुक्रमे 35 ते 50 हजार रुपये तर वरिष्ठ समुपदेशकांना 70 ते 80 हजार रुपये मासिक मानधन निश्चित करण्यात आले आहे. निवड झालेल्या किमान दहा समुपदेशकांसाठी वसतिगृहात स्वतंत्र खोलीची सुविधाही उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
ऑनलाइन अर्जाची सुविधा
इच्छुका उमेदवारांना 17 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. मुंबईतील उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती आयआयटी मुंबईत घेतल्या जातील. मुंबईबाहेर राहणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन मुलाखतीची सुविधा असेल. निवड झालेल्या उमेदवारांना 17 नोव्हेंबरदरम्यान रुजू होता येणार आहे.
... या उमेदवारांना प्राधान्य
किशोरवयीन आणि तरुणांसोबत काम करण्याचा अनुभव, निवासी शैक्षणिक संस्थेतील कामाचा अनुभव तसेच संकटाच्या परिस्थितीमधील प्रकरणे हाताळण्याचे कौशल्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते. इंग्रजी किंवा हिंदीव्यतिरिक्त भारतीय भाषांची जान असणाऱ्यांना उमेदवारांचाही निवड प्रक्रियेत विचार केला जाणार आहे. विविध भाषिक पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना समुपदेशनाची सुविधा मिळावी, यासाठी उमेदवारांची भाषिक विविधताही विचारात घेतली जाणार आहे.