देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अशी ओळख असलेल्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया' म्हणजेच 'एसबीआय'मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अनेकदा सोशल मीडियावर 'एसबीआय'मध्ये गेल्यानंतर 'लंच ब्रेक आहे, नंतर या' असं सांगितलं जातं असं म्हणून टीका केली जाते. मात्र सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये याच 'लंच ब्रेक'चा उल्लेख झाल्याचंही दिसत आहे. नेमकं या व्हिडीओत आहे काय आणि झालंय काय ते जाणून घेऊयात. तसेच यावर बँकने काय म्हटलंय ते ही पाहूयात...
काय आहे या व्हिडीओमध्ये
व्हायरल झालेल्या आणि चर्चेत असलेल्या या व्हिडीओ एका ग्राहकाकडून बँक चलनी नोटा जमा करण्यासाठी स्वीकारण्यास नकार देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नोटा जमा करण्यासाठी बँकेच्या शाखेत गेल्यानंतर ग्राहकाला आलेला अनुभव मोबाईल कॅमेरात कैद केला आहे. या व्हिडीओमध्ये बँकेत 100 आणि 50 च्या नोटांचे बंडल घेऊन डिपॉझिट करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने, 'हे पैसे मला बँकेत जमा करायचे आहेत', असं काऊंटरवरील बँक अधिकाऱ्याला सांगितलं. मात्र बँक अधिकाऱ्याने हे पैसे हाताने मोजावे लागतील असं सांगून बाजूला ठेवले आणि तो इतरांनी भरलेल्या बँक स्लीप आणि त्यांचे पैसे जमा करुन घेऊ लगला. त्यावेळी या व्यक्तीने, 'मी आधी तुम्हाला स्लीप दिली आहे आधी माझे पैसे जमा करुन घ्या' असं सांगितलं. त्यावर या व्यक्तीने, 'हे पैसे हाताने मोजून जमा करुन घ्यावे लागतील,' असं उत्तर दिलं. त्यावर ग्राहकाने, "मग हे काम तुमचं आहे की माझं?" असं विचारलं असता तो बँक अधिकारी गप्प बसल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर या ग्राहकाने, "तुम्ही मला हे पैसे जमा केले जाणार नाही असं लिहून द्या" अशी मागणी केली. त्यावरही या अधिकाऱ्याने काहीही उत्तर दिलं नाही.
लंच ब्रेकचा उल्लेख
या व्हिडीओमध्ये ग्राहकासोबत तेथील सुरक्षारक्षकही बोलतान दिसतोय. सुरक्षारक्षकाने ग्राहकाला लंच टाइम सुरु असल्याचं कारण आधी दिलं होतं असं त्यांच्या संभाषणावरुन दिसतंय. त्यावर ग्राहकाने, "कसला लंच टाइम?" असा सवाल केला. त्यावर सुरक्षारक्षकाने, "नाही लंच टाइम नाही पण चहापाण्याचा ब्रेक" असं म्हटलं. यावरुन, "ते काही नाही तुमचं तुम्ही काम करा आधी. हे पैसे जमा करुन घ्या," असं म्हटलं. मात्र समोरचा बँक अधिकारी पैसे जमा करुन घ्यायला तयार नव्हता. व्हिडीओमध्ये या अधिकऱ्याचा सहकारी तावातावात या ग्राहकाला, "जा व्हिडीओ दाखव जा, म्हणजे काम होईल," असं सांगताना दिसतोय.
कोणी शेअर केलाय हा व्हिडीओ अन् शेअर करताना काय म्हटलंय?
हा व्हिडीओ साहिल छाबरा नावाच्या व्यक्तीने शेअर करताना एक्सवर, "एसबीआय (SBI) कडून 50 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप!" या मथळ्याखाली शेअर केला आहे. या पोस्टमध्ये छाबरा यांनी, "सोशल मीडियावर एक प्रकरण चर्चेत आहे, ज्यामध्ये एसबीआयच्या कर्मचाऱ्यांनी 50 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याचे म्हटले जात आहे. यावरून ग्राहक आणि बँक कर्मचारी यांच्यात जोरदार वाद झाल्याचेही समोर आले आहे," असं म्हटलं आहे. सदर पोस्टमध्ये छाबरा यांनी, "बँक ग्राहकांकडून कायदेशीर चलन (चलन नोटा) स्वीकारण्यास नकार देऊ शकते का? या प्रकरणाची आरबीआयच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार तपासणी होणे आवश्यक आहे आणि एसबीआयनेही आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे," अशी मागणीही केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये 'एसबीआय' आणि 'आरबीआय'ला टॅग केलं आहे.
Allegations of SBI Refusing to Accept ₹50 Notes! A case circulating on social media alleges that SBI bank employees refused to accept ₹50 notes for deposit leading to a heated argument between the customer and a bank employee ❓ Can a bank refuse to accept valid currency notes from customers? The matter should be examined under RBI guidelines, and SBI should clarify its position @TheOfficialSBI @RBI #SBI #RBI #CustomerRights #BankingRules #PublicAwareness
— Sahil chabra (@sahii199) October 24, 2026
एसबीआयने दिला रिप्लाय
यावर एसबीआय सेवा या खात्यावरुन रिप्लाय करण्यात आला आहे. "तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. कृपया तुमचे पूर्ण नाव, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि शाखेचा कोड/नाव आम्हाला 'डायरेक्ट मेसेज'द्वारे कळवा, जेणेकरून आम्ही या विषयाबाबत आमच्या संबंधित प्रादेशिक टीमकडे पाठपुरावा करू," असं बँकेने म्हटलं आहे.
@sahii199 We regret for the inconvenience caused. Kindly share your full name, registered mobile number and the Branch Code/Name via Direct Message (DM), so that we can take up the issue with our concerned regional team. https://t.co/YISL3Is9W5
— SBI Cares (@OfficialSBICare) October 25, 2026
या प्रकरणात पुढे काय कारवाई झाली यासंदर्भातील तपशील समोर आलेले नसले तरी बँक कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाबद्दल या पोस्टखाली अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.