राज्य पाठ्यपुस्तक मंडळ बालभारतीने चालू शैक्षणिक सत्र (2026-27) पासून इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकात मोठे बदल केले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गंत हे बदल करण्यात आले आहेत. इयत्ता सहावीच्या इतिहास, भूगोल आणि विज्ञान या तीन विषयांच्या पाठ्यपुस्तकांत बदल केला आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, इतिहास, भूगोल आणि विज्ञानाची नवीन पाठ्यपुस्तके सादर करण्यात आली असून या नवीन पुस्तकांमध्ये प्राचीन ज्ञानग्रंथ, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक विद्वानांना स्थान देण्यात आले आहे. इतिहासाच्या काही सामाजिक आणि राजकीय घटकांच्या मांडणीत बदल करण्यात आले आहेत.
विज्ञानाच्या पुस्ताकात वैज्ञानित सिद्धांतासोबत प्राचीन भारतीय विद्वानांच्या योगदानाची माहिती देण्यात आली आहे. यात ‘फोर्स अँड प्रेशर’ (Force and Pressure) या धड्यात गुरुत्वाकर्षणाच्या चर्चेदरम्यान आयझॅक न्यूटनसोबतच भास्कराचार्य द्वितीय यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
भास्कराचार्य द्वितीय यांनी सुमारे 950 वर्षांपूर्वी त्यांच्या ‘सिद्धांत शिरोमणी’ या ग्रंथात पृथ्वी वस्तूंना आपल्याकडे आकर्षित करते हे स्पष्ट केले होते. त्यानुसार, नव्या पुस्तकात गुरुत्वाकर्षणच्या सिद्धांताला भारतीय विद्वानांच्या ऐतिहासिक योगदानासोबत जोडले गेले आहे.
विज्ञानाच्या ‘बियॉन्ड द स्काय’ या धड्यात आर्यभट्ट यांच्या खगोलशास्त्रातील योगदानाबाबत माहिती दिली आहे. एका विशेष बॉक्सच्या माध्यमातून आर्यभट्ट हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे समजावून सांगितले होते, अशी माहिती दिली आहे. या व्यतिरिक्त, चरक हे आयुर्वेदाचे संस्थापक म्हणून संबोधले आहे. सजीवांच्या वर्गीकरणातील त्यांचे योगदान समाविष्ट केले गेले आहे.
भूगोलाच्या नव्या पुस्तकात, भारतीय भौगोलिक इतिहासाला स्थान देण्यात आले आहे. यात भारतीय भूगोलाच्या इतिहासावरील एका नवीन धड्यात वेद, पुराण, उपनिषदे आणि सूर्य सिद्धांताचा संदर्भ देण्यात आला आहे. यामध्ये पृथ्वीचे वर्णन ‘सप्तद्वीप’ म्हणून करताना ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या वैदिक विचारांची तुलना ‘बिग बँक सिद्धांताशी’ करण्यात आली आहे.
आधीच्या पुस्तकांमध्ये केवळ ग्रीनिच मध्यरेखेचा उल्लेख होता, परंतु आता नवीन पुस्तकानुसार प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी उज्जैनला पृथ्वीचा केंद्रीय संदर्भबिंदू मानले होते आणि पहिल्यांदा मूळ रेखांशाची (Base Longitude) संकल्पना दिली होती, हे स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन पाठ्यपुस्तकात घटिका आणि मुहूर्त सारख्या पारंपारिक वेळ दाखवणाऱ्या एककांचा समावेश करण्यात आला आहे.
इतिहासाच्या पुस्तकात प्राचीन भारतातील महान शल्यचिकित्सक (सर्जन) महर्षी सुश्रुत यांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. आधीही सुश्रुत यांच्या कार्याची संक्षिप्त माहिती देण्यात आली होती. मात्र नव्या पाठ्यपुस्तकात विस्तृत स्वरुपात माहिती आहे. सुश्रुत यांच्या नाक पुनर्रचना (Nose Reconstruction) तंत्राचा आणि ‘सुश्रुत संहिता’ या ग्रंथाचा सविस्तर उल्लेख आहे
इतिहासाच्या जुन्या पुस्तकात चाणक्य यांचा उल्लेख मर्यादित स्वरुपात होत. मात्र नवीन पाठ्यपुस्तकात त्यांचे विचार आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राजाच्या जडण-घडण होण्यामागील त्यांची भूमिका याबाबत विस्तृत माहिती दिली आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, चाणक्य यांच्या अर्थशास्त्रात कर व्यवस्था, रक्षा, गुप्तचर तंत्र आणि राजकारण सारख्या विषयांचा समावेश होका.
इतिहासाच्या पुस्तकात वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या शिकवणी कायम ठेवल्या गेल्या आहेत, परंतु ईसवीसन पूर्व सहाव्या शतकात नवीन धर्मांच्या उदयाला जातीय भेदभाव आणि सामाजिक परिस्थितीशी जोडणारा जुना परिच्छेद हटवून, त्याला भारताची ‘धार्मिक विविधता’ म्हणून मांडण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाच्या कारणांमधून ‘परदेशी टोळ्यांचे आक्रमण’ हा मुद्दा पूर्णपणे हटवण्यात आला आहे. आता या ऱ्हासासाठी नदीच्या पात्रातील बदल, नैसर्गिक आपत्ती आणि सुमेरियन संस्कृतीसोबतच्या व्यापारातील घसरण या कारणांचाच समावेश करण्यात आला आहे.