‘पुन्हा आंदोलनात सहभागी होणार नाही’, इमरान खानची बिनशर्त माफी;भारत सोडण्याच्या नोटीसचं काय झालं? हायकोर्टातून मोठी अपडेट!
FRRO च्या नोटिशीला आव्हान देत इमरानने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. नोटीस देण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घेण्यात आली नाही, असा त्याचा आक्षेप होता.
बॉलिवूड अभिनेता इमरान खानला भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्यानंतर सुरू झालेल्या कायदेशीर वादाला आता नवे वळण मिळाले आहे. मुंबईतील आंदोलनात सहभागी झाल्याच्या आरोपावरून परदेशी नागरिक असलेल्या इमरानला बॉम्बे हायकोर्टाने सुनावले. त्यानंतर त्याने भविष्यात कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे आश्वासन देत बिनशर्त माफी मागितली. दरम्यान, न्यायालयाने त्यांच्याविरोधातील ‘लीव्ह इंडिया नोटीस’वरील स्थगिती ७ डिसेंबरपर्यंत कायम ठेवली आहे. न्यायालयात नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घेऊया.
आंदोलनात सहभागी झाल्याने FRRO ची नोटीस
इमरान खान हा अमेरिकेचे नागरिक असून त्याच्याकडे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्ड आहे. तो 10 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन झाला होता. हे आंदोलन मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेच्या विरोधात होते. या आंदोलनाच्या ठिकाणी इमरानला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी विदेशी नागरिक नोंदणी प्रादेशिक कार्यालयाने (FRRO) त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली.
नोटीसविरोधात हायकोर्टात धाव
FRRO च्या नोटिशीला आव्हान देत इमरानने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. नोटीस देण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घेण्यात आली नाही, असा त्याचा आक्षेप होता. यापूर्वी 28 ऑक्टोबरच्या सुनावणीत न्यायालयाने नोटीसला तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यामुळे 2 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्यावर भारत सोडण्याची कारवाई होणार नव्हती.
‘OCI कार्डधारक भारतीय नागरिकांप्रमाणे नाहीत’
2 नोव्हेंबरच्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने इमरानच्या आंदोलनातील सहभागावर प्रश्न उपस्थित केले. SIR प्रक्रियेचा त्यांच्यावर थेट परिणाम होत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. OCI कार्डधारक आणि भारतीय नागरिकांचे अधिकार समान नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल माफी मागण्यास आणि भविष्यात अशी कृती पुन्हा करणार नसल्याचे सांगण्यास त्याला सांगण्यात आले.
इमरानची बिनशर्त माफी
इमरानच्यावतीने ज्येष्ठ वकील वेंकटेश धोंड यांनी न्यायालयात बाजू मांडली. इमरानचा कोणत्याही आंदोलनकारी संघटनेशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. इमरानचा जन्म अमेरिकेत झाला असला तरी त्याचे संपूर्ण आयुष्य भारतात गेले आहे, असेही त्याच्या वकिलांनी नमूद केले. सुनावणीदरम्यान इमरानने बिनशर्त माफी मागितली आणि भविष्यात कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे हमीपत्र दिले.
भारत सोडण्याच्या नोटीसला स्थगिती
इमरान यांच्या याचिकेवरील पुढील सुनावणी 7 डिसेंबर रोजी होणार आहे. तोपर्यंत एफआरआरओ ने बजावलेल्या ‘लीव्ह इंडिया नोटीस’वरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. म्हणजेच, सध्या त्याच्यावर भारत सोडण्याची कारवाई होणार नाही. इमरान खानने मुंबई हायकोर्टात बिनशर्त माफी मागत भविष्यात आंदोलनात सहभागी न होण्याचे आश्वासन दिले. भारत सोडण्याच्या नोटीसला 7 डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली.