Rajat Patidar : पुरुष रायजिंग स्टार्स एशिया कपसाठी इंडिया ए संघाची घोषणा झाली आहे. 2 नोव्हेंबर रोजी संघाची घोषणा करण्यात आली असून कतारच्या दोहामध्ये 19 ते 29 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत रजत पाटीदारवर सुद्धा विश्वास वर्तवण्यात आला आहे. तिलक वर्मा संघाचे नेतृत्व करतील याव्यतिरिक्त स्टार सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांचाही 15 सदस्यीय संघात समावेश असणार आहे.
रजत पाटीदार उपकर्णधार :
आपल्या नेतृत्वात आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला लागोपाठ दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या कर्णधार रजत पाटीदारला पुरुष रायजिंग स्टार्स एशिया कपमध्ये इंडिया ए संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. 33 वर्षांच्या रजत पाटीदारने भारतासाठी तीन टेस्ट आणि एक वनडे सामना खेळला. आयपीएल 2026 मध्ये रजत पाटीदारने धावांचा डोंगर उभा केला. 15 सामन्यात 5 अर्धशतकांच्या मदतीने 501 धावा ठोकल्या.
रजतला त्याच्या या परफॉर्मन्सचं बक्षिस सुद्धा मिळालं आणि 'इंडिया ए' संघात त्याला सातत्याने संधी दिली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात त्याने ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या सामन्यात 'निळी जर्सी' परिधान करून मैदानातही पाऊल ठेवले होते. पाटीदारने 2023 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2024 मध्ये एक टेस्ट सामना खेळला, त्यानंतर मात्र तो वरिष्ठ संघातून बाहेर आहे.
भारत - पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये :
ग्रुप बी मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ सोबत असून त्यांच्या ग्रुपमध्ये नेपाळ आणि यूएई यांचा सुद्धा समावेश आहे. ग्रुप ए मध्ये बांगलादेश ए, श्रीलंका ए, अफगाणिस्तान ए आणि हॉंगकॉंगच्या संघांचा समावेश होता. इंडिया ए चा पहिला सामना हा 20 नोव्हेंबर रोजी नेपाळ विरुद्ध खेळवला जाईल. पाकिस्तान ए विरुद्धचा दुसरा सामना 22 नोव्हेंबर रोजी होईल, तर गट टप्प्यातील शेवटचा सामना 24 नोव्हेंबर रोजी संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध खेळला जाईल. पहिला सेमी फायनल सामना 26 नोव्हेंबर रोजी आणि दुसरा सेमी फायनल सामना 27 नोव्हेंबर रोजी होणार असून अंतिम सामना 29 नोव्हेंबर रोजी नियोजित आहे.