टायगर श्रॉफवरील हल्ल्याचं खरं कारण आलं समोर, आरोपींसंदर्भात मोठा खुलासा, नेपाळला पळून जाण्याच्या होते तयारीत
अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाशी संबंधित तीन संशयितांना राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यासाठी आरोपींना 50 हजार रुपये मिळाले होते.
मुंबईत बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी राजस्थानमधील कोटा येथून तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनुसार, या हल्ल्यासाठी आरोपींना आगाऊ 50 हजार रुपये देण्यात आले होते. मुंबई पोलीस, राजस्थान पोलीस आणि रेल्वे पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत, सोमवारी सकाळी कोटा रेल्वे स्थानकावर या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. हे तिघे मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करत होते. दरम्यान हल्ल्यानंतर आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हल्ल्याचं नेमकं कारण काय?
बिश्नोई गँगमधील स्थान मजबूत करण्यासाठी अनिल पंडित, हरमनन संधूकडून टायगरवर हल्ला करण्यता आल्याचा मुंबई पोलिसांचा दावा आहे.
आरोपी रेहानचा मोठा खुलासा!
मुंबई गोळीबार प्रकरणात कोटा येथून पकडण्यात आलेला आरोपी रेहान हा अनिल पंडितच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे कथित संबंध तपासले जात आहेत. अनिल पंडित आणि आरोपींमधील संपर्क, तसेच या प्रकरणातील संभाव्य कटाची भूमिका याबाबत तपास यंत्रणा अधिक चौकशी करत आहेत.
हल्लेखोर एका हँडलरच्या संपर्कात होते
हे तिघेही एकाच हँडलरच्या संपर्कात होते आणि 'सिग्नल' (Signal) व 'टेलिग्राम' (Telegram) ॲप्सद्वारे सतत संदेशांची देवाणघेवाण करत होते तसेच आपापली ठिकाणे एकमेकांना शेअर करत होते. हा हँडलर स्वतः अनिल पंडित होता की त्याच्या जवळची एखादी व्यक्ती, याचा तपास सुरू आहे. तपासातून असे समोर आले आहे की, रेहान हा अनिल पंडितच्या संपर्कात होता; तपास यंत्रणांना याचे डिजिटल पुरावे (डिजिटल फूटप्रिंट्स) सापडले आहेत. रेहानच्या सांगण्यावरूनच सोनीपतचा एक अल्पवयीन तरुण या कटात सामील झाला होता. मुंबईत आधीच उपस्थित असलेल्या ऋतिकने, त्या अल्पवयीन शूटरला आणि रेहानला आवश्यक ती मदत पुरवली होती.
हल्ल्यात वापरलेली दुचाकी जप्त
मुंबई पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेत हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. ही मोटारसायकल अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ बेवारस स्थितीत सापडली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून या वाहनाचा माग काढला, जो त्यांना अंधेरी पश्चिमेकडील डी.एन. नगर परिसरापर्यंत घेऊन गेला. फुटेजमध्ये हल्लेखोर मोटारसायकल सोडून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाताना दिसत असल्याचे समजते.
आरोपींनी मुंबईतून पळून जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास केल्याचा पोलिसांना संशय आहे. मुंबई पोलिसांनी कोटा पोलिसांना त्यांच्या संशयास्पद हालचालींबाबत सतर्क केले होते, त्यानंतर या तिघांना रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले आणि राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.