CID चे दिग्दर्शक बी पी सिंग यांचं निधन, ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू
टीव्हीवरील प्रसिद्ध 'सीआयडी' (CID) आणि 'आहट' (Aahat) ही हॉरर मालिका निर्माण करणारे निर्माते व दिग्दर्शक बी. पी. सिंग यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले.
हिंदी दूरदर्शनवरील अत्यंत दीर्घकाळ चाललेली 'सीआयडी' (CID) आणि 'आहट' (Aahat) ही हॉरर मालिका यांची निर्मिती करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते ब्रिजेंद्र पाल सिंग यांचे निधन झाले आहे. त्यांना बी पी सिंग या नावानेही ओळखलं जात होतं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी अभिनेता आणि 'सिन्टा'चे (CINTAA) प्रतिनिधी अमित बहल यांनी दिली, ज्यांनी या दोन्ही मालिकांमध्ये बी. पी. सिंग यांच्यासोबत काम केले होते. बहल यांच्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबरच्या सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मागील अनेक वर्षांपासून आरोग्याशी संबंधित विविध समस्यांचा सामना करत होते.
1998 मध्ये, सिंग यांनी 'सीआयडी' (CID) या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन केले, जी भारतीय दूरदर्शनच्या इतिहासातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या मालिकांपैकी एक ठरली. याव्यतिरिक्त, त्यांनी या मालिकेत 'डीसीपी शमशेर सिंग चित्रोले' ही भूमिकाही साकारली होती.
ऑक्टोबर 2004 मध्ये, त्यांनी 'सीआयडी'च्या 'द इनहेरिटन्स' नावाच्या एका विशेष भागाचे त्यांनी दिग्दर्शन केले. 111 मिनिटांच्या या भागाचे चित्रीकरण सलग एकाच 'टेक'मध्ये पूर्ण करत त्यांनी नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले होते. त्यांनी सोनी टीव्हीवरील 'आहट' (Aahat) या भयपट मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले, ज्याने 1995 ते 2015 अशा दोन दशकांच्या कालावधीत प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.
मनोरंजन विश्वातून श्रद्धांजली
अमित बहल यांनी सिंग यांना श्रद्धांजली वाहिली असून या दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्याची आठवण सांगितली आणि त्यांच्यासोबतच्या जवळपास तीन दशकांच्या सहवासाचा उल्लेख केला. बेहल म्हणाले, " 'आहट' (Aahat) आणि 'सीआयडी' (CID) सारख्या गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून माझा त्यांच्याशी सुमारे 30 वर्षांचा संबंध राहिला आहे. बी. पी. सिंग जी तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कुशल आणि अफाट ज्ञानी होते. वरवर पाहता ते कठोर वाटायचे आणि अनेकदा लोक त्यांना पाहून घाबरायचेही, पण प्रत्यक्षात ते अत्यंत दयाळू आणि मदतीला तत्पर असणारे व्यक्ती होते. माझ्यासाठी ते एका पितृतुल्य व्यक्तिमत्त्वासारखे होते."
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही इन्स्टाग्राम पोस्टद्वारे या दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिले, "आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक बी. पी. सिंग जी यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून दुःख झाले. एक प्रतिभावान चित्रपट निर्माते, ज्यांनी 'सीआयडी' आणि 'आहट' सारख्या क्राईम मालिकांच्या माध्यमातून संपूर्ण देशाला खिळवून ठेवले होते. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठीही ते प्रेरणास्थान राहील."
'सीआयडी'मध्ये 'दया' हे पात्र साकारणारे दयानंद शेट्टी यांनी , "बी. पी. सिंग जी यांचे आयुष्य म्हणजे केवळ आशयनिर्मिती होते. ते आपल्या कामाप्रती पूर्णपणे समर्पित आणि अत्यंत उत्साही होते. ते आपल्या काळातील सर्वोत्तम कॅमेरामनपैकी एक होते. त्यांची प्रकृती काही काळापासून ठीक नव्हती आणि आज सकाळी ते झोपेतून उठलेच नाहीत. वयोमानानुसार उद्भवलेल्या आजारपणामुळे त्यांचे निधन झाले.", अशी माहिती दिली आहे.