बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचे पुत्र अभिनेते अभिषेक बच्चन यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गोल्डी ढिल्लोंच्या नावाने करण्यात आलेल्या फेसबुक पोस्टमध्ये दोघांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली. या पोस्टमध्ये 1984 च्या शीखविरोधी दंगलींचाही उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दिल्ली पोलिसांनी दोन संशयितांना अटक केल्यानंतर ही धमकी समोर आली. यात 2 गँगस्टर सोशल मीडियात एकमेकांविरोधात भिडलेयत. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
16 नोव्हेंबर रोजी गोल्डी ढिल्लोंच्या नावाने फेसबुकवर एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना थेट लक्ष्य करण्यात आले. दोघांच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ काच किंवा अन्य व्यवस्था केली, तरी त्यांना लक्ष्य केले जाईल, अशा आशयाची धमकी पोस्टमध्ये देण्यात आली. 1984 मधील शीखविरोधी दंगलींचा संदर्भ देत त्या घटनेतील दोषींना माफ करणार नसल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे.
गोल्डी ढिल्लोंच्या नावाने करण्यात आलेल्या पोस्टमध्ये मुंबईत आपले सुमारे 200 साथीदार सक्रिय असल्याचा दावा करण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने विकास ठाकूर आणि दीपक सिंह यांना अटक केली असली, तरी त्यामुळे कथित प्लान थांबणार नसल्याचा इशाराही देण्यात आला.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने विकास ठाकूर आणि दीपक सिंह या दोघांना अटक केली आहे. हे दोघे लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा आणि अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील 'जलसा' निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याच्या कथित कटात त्यांचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या अटकेमुळे बच्चन कुटुंबाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दोघांवरील आरोप अद्याप तपासाधीन आहेत.
या धमकीनंतर मुन्ना ब्रॅम्प्टन आणि मंदीप स्पेन यांच्या नावाने सोशल मीडियावर गोल्डी ढिल्लोंविरोधात पोस्ट करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या पोस्टमध्ये गोल्डी ढिल्लों प्रसिद्धीसाठी धमक्या देत असल्याचा आरोप करण्यात आला. त्याच्यावर पंजाबमधील अमली पदार्थांची विक्री आणि केबल चोरीसारख्या गुन्ह्यांचे आरोप असल्याचेही म्हटल्याचे सांगितले जाते.
अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील 'जलसा' निवासस्थानाला यापूर्वीही बॉम्बच्या धमकीचे ई-मेल आल्याचे वृत्त आहे. चाहत्यांना भेटताना अमिताभ बच्चन बुलेटप्रूफ काचेमागे उभे राहिल्याचे दृश्यही समोर आले होते. नव्या धमकीमुळे त्यांच्या आणि अभिषेक बच्चन यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.