छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्या गोलवाडी येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोंधळाच्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. घरावर बाटल्या फेकून हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या तिन्ही तरुणांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. रोहित भुताळे, शिवम गायकवाड आणि प्रतीक कुटे अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणात अटकेपासून न्यायालयीन कोठडीपर्यंतची कारवाई झाली. त्यानंतर कोर्टात काय घडलं? कोर्टाने काय निर्णय दिला? सविस्तर जाणून घेऊया.
12 नोव्हेंबरच्या रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास संजय शिरसाठ यांच्या गोलवाडी लिंक रोडवरील निवासस्थानाबाहेर तीन तरुणांनी गोंधळ घातल्याची घटना घडली. तरुणांनी बंगल्याच्या दिशेने काचेच्या बाटल्या फेकल्या. सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता वाद वाढला. तरुणांनी बंगल्याच्या आवारात प्रवेश करण्याचाही प्रयत्न केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटलंय या झटापटीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाले.
या घटनेनंतर सातारा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. रोहित स्वप्नील भुताळे, शिवम ज्ञानेश्वर गायकवाड आणि प्रतीक चांगदेव कुटे अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणणे, धमकी देणे, अनधिकृत प्रवेश आणि इतर संबंधित आरोपांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू असून तिघांची चौकशी करण्यात आली होती.
अटकेनंतर तिन्ही तरुणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले, आता तिन्ही आरोपींना जामीन मंजूर झालाय. आरोपींच्या वतीने ॲड. शुभम काहिटे यांनी न्यायालयात बाजू मांडली. जामीन मंजूर झाला असला तरी आरोपातून निर्दोष मुक्तता झालेली नाही.
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर बंगल्यावर नेमके काय घडले, याबाबत चर्चा सुरू झाली. उपलब्ध फुटेजमध्ये बाटल्या फेकल्याचे स्पष्ट दिसत नसल्याचा दावा केला जातोय.
या घटनेनंतर संजय शिरसाठ यांनी स्थानिक पोलिसांच्या प्रतिसादाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आपल्या निवासस्थानाबाहेर गंभीर प्रकार घडत असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने उपलब्ध झाले नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे मंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा आणि शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा चर्चेत आला. आता तिन्ही आरोपींना जामीन मिळाल्यानंतर पुढील तपास आणि न्यायालयीन सुनावणीत काय घडते? याकडे लक्ष लागले आहे.