Aamne Saamne Play Controversy: आमने-सामने या मराठी नाटकातील वाद संपता संपत नाहीये. अभिनेत्री रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी विलास यांना तडकाफडकी नाटकातून रिप्लेस करण्यात आले होते. त्यानंतर कलाकार आणि निर्माते दोघांनीही आपापली बाजू मांडली होती. आता या प्रकरणात ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी प्रतिक्रिया देत कलाकारांना खडे बोल सुनावले आहेत. वंदना गुप्ते यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी नाटकातील कलाकार आणि निर्मात्यांना उद्देशून म्हणणं मांडले आहे.
वंदना गुप्ते यांनी व्हिडिओत म्हटलंय की, ''लीना आणि मंगेश मी तुमचा व्हिडिओ पाहिला. मला खरंच फार वाईट वाटलं, मलाही भरून आलं. पण आपणही कलाकार आहोत आणि आपण या सगळ्यातून गेलेलो आहोत. मलाही आठवतंय... सुरुवातीला मला 80 रुपये मिळायचे, ते शंभर रुपये करा यासाठी मी मोहन काकांना जवळपास 15 वेळा तरी सांगितलं होतं. तेव्हा मग त्यांनी शंभराव्या प्रयोगाला माझं मानधन वाढवलं. हे सगळं ठिक आहे, पण आपण असं करत नाही ना गं, अचानक त्या कलाकारांना थांबवायचं आणि सांगायचं नाही हा तुमचा शेवटचा प्रयोग आहे. असा आपला कोणी अपनान केला तर, आपल्याला सहन होईल का? मंगेशलाही सहन होणार नाही. एक पद्धत असते सांगायची. विचार करुन या गोष्टी करायला हव्या होत्या, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे.''
लीना आणि मंगेश दोघांनाही सांगते, कलाकार म्हणून आपल्याला निर्मात्याकडं मानधन वाढवून मागायचा हक्क आहे. आत्ता आलेली माणसं आहे, त्यातही तुमच्यासोबत पाच वर्षांपासून जोडली गेलेली आहेत, त्यामुळे असं नका ना करू. तसंच मागतानाही त्यांनीही विचार करायला हवा होता, तीन तीन वेगळा तुम्ही कसं मागता. तुम्ही पण विचार करायला हवा होता, की अचानक काढून टाकायचं, हा तुमचा शो नाहीये. हे मला तुमचंही पटलेलं नाहीये, असं वंदना गुप्ते यांनी म्हटलं आहे.
रोहन आणि केतकी... प्रत्येकाची एक गरज असते. प्रत्येकाचं एक स्टेटस असतं. त्याचंही ते वाढत जातं. इतकी 50 वर्षे काम केल्यानंतर अजूनही मी माझं मानधन वाढवा हे सांगायला बिचकते, ही आजकालची ही मुलं ऐकत नाहीत. त्यांना हवं असतं ते, आणि का असू नये. प्रत्येकाची इच्छा असते ना की, इतकं मिळतंय तर त्यातलं थोडं आपल्यालाही हक्काचं मिळावं. अशी कॉंट्रोव्हर्सी बरी नाहीये. कलाकार म्हणून सांगतेय, निर्माता म्हणून नाही, असं वंदना गुप्ते यांनी स्पष्ट केलं आहे.
वंदना गुप्ते यांच्या व्हिडिओवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नाटकातील कलाकार केतकी विलास हिने व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं आहे की, वंदना ताई तीन दिवसांच्या अस्वस्थेमध्ये समाधान देणारी आहे ही पोस्ट. खूप खूप आभार आमची बाजू समजून घेतल्याबद्दल. त्याचबरोबर, अभिनेता रोहन गुजर यानेही कमेंट करत म्हटलं आहे की, वंदू मावशी तुझे कसे, किती आणि कोणत्या शब्दात आभार मानू मला कळत नाहीये. पाठीशी असण्यासाठी आणि कान उघडणीसाठी. खूप खूप प्रेम.