राखी सावंतच्या अडचणी वाढल्या! 16 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी; नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री राखी सावंतच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. झाशीच्या एका न्यायालयाने 16 वर्षे जुन्या प्रकरणाच्या संदर्भात तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत आता एका कायदेशीर अडचणीत सापडली आहे. तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल १६ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात न्यायालयाने हे पाऊल उचलले असून, उत्तर प्रदेशातील झाशी न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. राखी सावंत तिच्या हटके वक्तव्यांमुळे आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, यावेळी तिच्या चर्चेचे कारण मनोरंजनविश्वातील कोणताही वाद नसून, २०१० मधील एक जुने प्रकरण आहे. या प्रकरणाचा संबंध एका तरुणाच्या मृत्यूशी असल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
काय आहे १६ वर्षांपूर्वीचं प्रकरण?
उपलब्ध माहितीनुसार, झाशी येथील लक्ष्मण अहिरवार या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी राखी सावंतविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. लक्ष्मणच्या आईने अभिनेत्रीविरोधात तक्रार केली होती. राखीच्या कार्यक्रमात आपल्या मुलाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप तिने केला होता. या प्रकरणात न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले होते. मात्र, राखी सावंत न्यायालयात हजर राहत नसल्याने तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती सरकारी वकील मृदुल कांत श्रीवास्तव यांनी दिली.
वैवाहिक वाद पोहोचला होता राखीच्या कार्यक्रमात
सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण अहिरवार हा झाशीतील प्रेमनगर परिसरातील टोरिया मोहल्ल्यात राहत होता. तो हातगाडीवर भाजी विकण्याचा व्यवसाय करत होता. १९ फेब्रुवारी २०१० रोजी त्याचा राजगढ येथील अनिता हिच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर साधारण सात महिन्यांनी दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यानंतर अनिता माहेरी निघून गेली. अनिताने लक्ष्मणच्या एका नातेवाइकाच्या वर्तनाबाबत आक्षेप घेतल्याचे तसेच लक्ष्मण मद्यपान करून मारहाण करत असल्याचा आरोप केल्याचे वृत्त आहे. पती-पत्नीमधील हा वाद पुढे राखी सावंतच्या ‘राखी का इंसाफ’ या दूरचित्रवाणी कार्यक्रमापर्यंत पोहोचला. या कार्यक्रमात लक्ष्मणला बोलावण्यात आले होते.
कार्यक्रमानंतर लक्ष्मण मानसिक तणावात?
लक्ष्मणच्या आईने केलेल्या आरोपानुसार, कार्यक्रमात राखी सावंतने त्याचा अपमान केला होता. त्याला ‘नामर्द’ असे संबोधण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला. २३ ऑक्टोबर २०१० रोजी हा भाग प्रसारित झाल्यानंतर लक्ष्मण लोकांसमोर जाण्यास घाबरू लागला होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्याने खाणे कमी केले होते आणि त्याच्या प्रकृतीतही बिघाड होऊ लागला होता. राखीमुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे तो आईजवळ बोलत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला होता.
यानंतर ९ नोव्हेंबर २०१० रोजी लक्ष्मणला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १० नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर लक्ष्मणच्या आईने राखी सावंतविरोधात तक्रार दाखल केली होती. आता या जुन्या प्रकरणात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. आगामी सुनावणीत काय घडते आणि राखी सावंत न्यायालयात हजर राहते का, याकडे लक्ष लागले आहे.