अभिनेता रणबीर कपूर आणि यश यांच्या 'रामायण' चित्रपटाची 1500 कोटी रुपयांच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. या चित्रपटामधील अनेक सीन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यापैकीच सर्वाधिक चर्चेत असलेला सीन म्हणजे जटायू आणि रावणामधील संघर्ष! यशने साकारलेला रावण आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी जटायूला दिलेला आवाज याबरोबरच या सीनसाठी वापरण्यात आलेले व्हीएफएक्समुळेही हा सीन चर्चेत आहे. रावणाने सीतेचं हरण करून तिला पुष्पक विमानातून लंकेला घेऊन जाताना जटायूने त्याची वाट अडवली आणि दोघांमध्ये तीव्र संघर्ष झाला.
पूर्ण ताकदीने रावणाविरुद्ध लढला जटायू
गिधाडांचा राजा अशी ओळख असलेल्या जटायूने आपली सर्व शक्ती पणाला लावून सीतेला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र रावणाच्या शक्तीपुढे त्याचं काही चाललं नाही. रावणाने अखेरचा वार केल्यानंतर पुष्पक विमानातून खाली पडणाऱ्या जटायूचं एक नख रावणाने खेचून घेतल्याचं 'रामायण' चित्रपटात पाहायला मिळलं. मात्र रावणाने शत्रू असलेल्या जटायूचं एक नख तोडून स्वत: जवळ का ठेवलं? असा प्रश्न या चित्रपटातील गाजलेल्या दृष्यानिमित्ताने अनेकांना पडला आहे. खरं तर रामायण अगदी पाठ असलेल्या 99 टक्के लोकांना हे दृष्य चित्रपटात का दाखवलं आहे याची कल्पना नाही. त्याचसंदर्भात जाणून घेऊयात....
रावण जटायूचे नख स्वतःजवळ का ठेवतो?
रावण आणि जटायू दरम्यान झालेल्या भीषण संघर्षामध्ये जटायू आपल्या नखांनी रावणाचे शीर धडापासून वेगळे करतो. मात्र, रावणाकडे आपले तुटलेले शीर पुन्हा धडाला जोडून घेण्याची मायावी शक्ती असते. आपल्या दैवी शक्तींचा वापर करून, रावण लगेचच एक नवीन शीर आपल्या धडावर लावतो. त्यानंतर तो पूर्वीपेक्षाही अधिक ताकदीने जटायूवर हल्ला करतो. युद्धादरम्यान, रावण आपल्या तलवारीने जटायूचा एक पंखही कापताना दिसतोय. गंभीर जखमी झालेला जटायू बेशुद्ध पडतो. मग रावण तलवारीने जटायूच्या छातीत वार करतो. त्याला पुष्पक विमानातून खाली फेकण्यापूर्वी, रावण त्याचे एक नख तोडून स्वतःजवळ ठेवतो. तोडलेल्या नखाकडे पाहणारा रावणही या सीनमध्ये दाखवण्यात आला आहे.
यामागील कारण काय?
चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या या दृश्यामधून रावणाच्या स्वभावाचे पैलू दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जटायूसारख्या योद्ध्याने आपला मार्ग अडवल्याने रावणाचा आत्मसन्मान दुखावला गेला. रावण अहंकारी होती. त्यामुळे एवढा कठोर संघर्ष करावा लागल्याने त्याच्या अहंकारालाही धक्का लागला. रावणाला स्वत:ची शक्तीचा फार गर्व होता. रावण तिन्ही लोकांमधील जीवांना स्वत:च गुलाम मानायचा. आपल्यापुढे आणि आपल्याकडे असलेल्या दैवी शक्तीपुढे प्रत्येकाने नतमस्तक झालं पाहिले असा रावणाचा अट्टाहास असायचा. असं असताना एका पक्षाने आपल्याला जखमी केलं, पक्षाशी लढताना आपल्याला दैवी शक्ती वापरावी लागली या साऱ्या गोष्टी आपला अपमान करणारा असल्याचं रावणाला वाटलं.
याच रागातून रावणाने जटायूचे नख स्वत:कडे जपून ठेवले. आपल्या आपमानाचं प्रतिक म्हणून रावणाने हे नख जपून ठेवल्याचं सांगितलं जातं. जटायूला हरवल्यानंतरही रावणाला स्वत:चे शौर्य आणि पराक्रम विसरायचा नव्हता. आपण एखाद्यावर मात केली याचं प्रतिक म्हणून तो जटायूचं नख काढून घेतो. अर्थात हे एक काल्पनिक दृष्य असलं तरी त्यातून रावणाचा अहंकार अधोरेखित करण्याचा हेतू आहे.