'भारताने 5 हजार वर्षांपूर्वीच...'; एलन मस्कच्या फ्लाइंग कारवर रणबीर कपूर हे काय बोलून गेला?
रणबीर कपूर सध्या चर्चेत आहे ते रामायण सिनेमामुळं. अलीकडेच त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळं सोशल मीडियावर तो ट्रोलही झाला आहे.
काहीच दिवसांत रणबीर कपूरचा बहुप्रतीक्षित रामायणम् हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. रणबीरच्या या मेगा प्रोजेक्टकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सगळी स्टारकास्ट सज्ज झाली असून अलीकडेच एका मुलाखतीच्या निमित्ताने रणबीर कपूर, रवि दुबे, रकुल प्रीत सिंह, यश आणि दिग्दर्शक नितेश तिवारी एकत्र आले होते. या मुलाखतीत रणबीरने टेस्ला कारबाबत केलेल्या एका वक्तव्याची चर्चा होतेय.
स्टार टॉक्सला दिलेल्या मुलाखतीत, सूत्रसंचालकाने रामायण काळातील शस्त्रास्त्रांची स्तुती केली होती. रामायण काळातील शस्त्र आधुनिक शोधांनाही टक्कर देऊ शकतील असे त्याने म्हटलं होतं. त्यांनी अकादमी पुरस्कार-विजेत्या DNEG (डबल निगेटिव्ह) स्टुडिओने केलेल्या VFX चेही कौतुक केले. यावर चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश म्हणाले की, त्या गोष्टी पडद्यावर पुन्हा साकारणे हा एक उत्तम अनुभव होता. यावर रणबीर म्हणाला, "अलीकडेच एलॉन मस्कने उडणारी कार बनवली. मला वाटतं भारताने हे 5,000 वर्षांपूर्वीच केलं होतं!"
रणबीर कपूरने टेस्लाच्या उडणाऱ्या कारची तुलना रामायण काळातील पुष्पक विमानाशी केली आहे. रणबीर कपूरने केलेल्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. काहींना मात्र रणबीरचे हे विधान खटकले आहे. तर काहींनी त्याच्या विधानाच समर्थन केले आहे.
पुष्पक विमान हे हिंदू पौराणिक कथांमधील आणि रामायणातील एक दिव्य, आकाशात उडणारे चमत्कारिक वाहन किंवा विमान होते. हिंदू पुराणानुसार, या वाहनाची निर्मिती भगवान विश्वकर्मा यांनी केली होती. सर्वप्रथम हे वाहन ब्रह्मदेवांकडे होते. नंतर त्यांनी ते वाहन संपत्तीची देवता कुबेर यांना दिले. नंतर रावणाने कुबेराचा पराभव करुन ते पुष्पक विमान आपल्या ताब्यात घेतले. भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण लंकेतून अयोध्येला परतण्यासाठी याच पुष्पक विमानातून प्रवास केला होता.
दरम्यान, एलॉन मस्कने टेस्लाची नवीन रोडस्टार कार लाँच केली असून त्यात रॉकेट स्टाइल थ्रस्टर्स लावण्यात आले आहेत. मस्क यांच्या दाव्यानुसार, ही गाडी हवेत उडू शकते. टेस्लाने 2028पर्यंत ही कार लाँच होऊ शकते, असा दावा केला आहे.
रामायण कधी प्रदर्शित होणार?
नितेश तिवारीचा रामायणम् हा प्राचीन भारतीय महाकाव्यावर आधारित आहे. हा सिनेमा दोन भागांत येणार आहे. यात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारात आहे. यात साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसत आहे. तर, रबी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसत आहे. हा सिनेमाचे निर्माते नमित मल्होत्रा आणि यश हे आहेत. याचे संगीत ए.आर. रहमान आणि हंस जिमर यांनी तयार केले आहे. चित्रपटाचा पहिला भाग दिवाळीच्या मुहूर्तावर 5 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.