टायगर श्रॉफवर हल्ला झाल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांना धमक्या मिळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. अभिनेते अमिताभ बच्चन, तुषार कपूर आणि आयुष्मान कपूर यांनाही काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता अभिनेता सैफ अलीखानला धमकी देण्यात आली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा खळबळ उडाली असून कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उभा ठाकला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सैफ अली खानला राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी झिशान अख्तरच्या नावाने धमकी मिळाल्याची माहिती समोर येतेय. मुंबई पोलिसांकडून या धमकीची चौकशी करण्यात येत आहे.
अभिनेता तुषार कपूर आणि आयुष्मान खुरानालाही यापूर्वी धमक्या मिळाल्या होत्या. या प्रकरणात बंगळुरूतील IIT पदवीधर वैभव मिश्रा (30) याला अटक, AI च्या माध्यमातून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र नंतर वैभव मिश्राचा कोणत्याही टोळीशी संबंध नसल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं.
मुंबई पोलिसांकडून सैफ अली खानला मिळालेल्या धमकीची चौकशी करण्यात येत आहे. धमकी झिशान अख्तरनेच दिली की त्याच्या नावाने अन्य कोणी दिली याची पडताळणी सुरू आहे. दरम्यान, बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर झिशान अख्तरला वॉन्टेड घोषित केले आहे. पोलिसांकडून त्याचा शोधही सुरू आहे.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हे बॉलिवूड कलाकारांच्या खूप जवळचे होते. ते दरवर्षी सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासह अनेक चित्रपट आणि टीव्ही कलाकारांना त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी आमंत्रित करत असत. 24 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील वांद्रे येथे बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला. ते त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर होते. रात्री सुमारे साडेनऊ वाजता हल्लेखोरांनी गोळीबार केला, त्यात ते जबर जखमी झाले होते. त्यानंतर लिलावती रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले होते.
अनमोल बिश्नोई, मोहम्मद यासीन अख्तर उर्फ झीशान अख्तर आणि शुभम लोणकर हे बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता, यापैकीच एकाचे नाव सैफ अली खान धमकी प्रकरणातही आले आहे. हे सर्व आरोपी फरार आहेत.