जेलमध्ये सिगारेट मिळणार नाही म्हणताच संजय दत्तच्या भन्नाट उत्तराने अधिकाऱ्यांनाही बसला धक्का!
संजय दत्तच्या या आठवणींमधून त्याने तुरुंगातील कठीण परिस्थितीतही स्वतःचं मनोबल आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता कायम ठेवली, हे दिसून येतं.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने आपल्या आयुष्यातील कठीण काळातील तुरुंगवासाच्या आठवणी पुन्हा एकदा सांगितल्या आहेत. अभिनेता शेखर सुमन यांच्या कार्यक्रमात बोलताना त्याने तुरुंगातील मानसिक दबाव, ‘अंडा सेल’मधील दिवस आणि स्वतःचं मनोबल कसं टिकवलं, याचा खुलासा केला. विशेष म्हणजे, तुरुंग अधिकाऱ्याने सिगारेट न मिळण्याची धमकी दिल्यानंतर संजय दत्तने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.
‘अंडा सेल’मध्येही खचला नाही
शेखर सुमन यांनी संजय दत्तला तुरुंगातील काळाबद्दल विचारलं. संजयला ‘अंडा सेल’मध्ये ठेवण्यात आलं होतं. अशा परिस्थितीतही त्याने आपलं मानसिक संतुलन ढळू दिलं नाही. त्याला कधी स्वतःचं आयुष्य संपवावंसं वाटलं का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजयने स्पष्टपणे “कधीच नाही” असं सांगितलं. कठीण परिस्थितीतही आपण मानसिकदृष्ट्या मजबूत राहिलो, असं त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होतं.
तुरुंग अधिकाऱ्यांनी मानसिकदृष्ट्या तोडण्याचा प्रयत्न केला
संजय दत्तच्या म्हणण्यानुसार, तो मोठा अभिनेता असल्यामुळे त्याच्याकडे अनेक सुखसोयी असतील आणि त्या हिरावून घेतल्यास तो खचेल, असं तुरुंग प्रशासनाला वाटत होतं. मात्र, या परिस्थितीचा त्याच्यावर अपेक्षित परिणाम झाला नाही. उलट, आपण परिस्थितीशी जुळवून घेत राहिलो आणि मनोबल कायम ठेवलं, असं संजयने सांगितलं. अधिकाऱ्यांना त्याची ही प्रतिक्रिया अनपेक्षित होती.
‘सिगारेट मिळणार नाही’ म्हटल्यावर संजयचा भन्नाट पलटवार
संजयने एक खास प्रसंग सांगितला. तुरुंगातील एका अधिकाऱ्याने त्याला चिडवत म्हटलं की, “तुला इथे सिगारेट मिळणार नाही, आता काय करशील?” यावर संजयने कोणतीही घाबरलेली प्रतिक्रिया न देता मिश्कीलपणे विचारलं, “सर, इथे बीडी तर मिळेल ना?” त्याच्या या उत्तराने वातावरणच बदललं. आपल्याला मानसिकदृष्ट्या तोडण्याचा प्रयत्न होत असतानाही आपण परिस्थिती हलक्याफुलक्या पद्धतीने घेतल्याचं संजयने सांगितलं.
स्टारडमचा अहंकार कधीच नव्हता
संजय दत्तने आपल्या स्टारडमबद्दलही महत्त्वाचं विधान केलं. अनेक वर्षे अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळूनही आपल्यात स्टारडमचा अहंकार निर्माण झाला नाही, असं त्याने सांगितलं. चित्रपटांच्या सेटवर कामगारांसोबत जमिनीवर बसून जेवण्याची सवय असल्याचंही त्याने नमूद केलं. त्यामुळे तुरुंगातील साधं आणि कठीण आयुष्य स्वीकारताना आपल्याला फारसा धक्का बसला नाही, असं त्याचं म्हणणं होतं.
1993 प्रकरणापासून येरवडा तुरुंगापर्यंतचा प्रवास
1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या आरोपामुळे संजय दत्तला अटक झाली होती. दहशतवादाशी संबंधित आरोपांतून त्याची सुटका झाली; मात्र शस्त्र कायद्यांतर्गत त्याला दोषी ठरवण्यात आलं. २००७ मध्ये त्याला सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. नंतर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा पाच वर्षांपर्यंत कमी केली. उर्वरित शिक्षा भोगल्यानंतर २५ फेब्रुवारी २०१६ रोजी पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहातून त्याची सुटका झाली.