प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री शबाना आझमी त्यांच्या कामासोबतच त्यांच्या मतांसाठी आणि स्पष्टवक्त्येपणामुळे ओळखल्या जातात. त्यांनी अनेकदा अशी काही वादग्रस्त वक्तव्य केली आहे त्यामुळे त्या अनेकदा चर्चेत आल्या आहेत. आता त्यांची एक मुलाखत सोशल मिडियावर मोठ्या प्रमामात चर्चेत पाहायला मिळत आहे यामध्ये त्यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे त्यामुळे सोशल मिडियावर अनेक मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये त्यांनी हिजाब घालण्याबद्दल आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, त्या धार्मिक चालीरीतींचे पालन करत नाहीत, पण जर कोणी त्यांना बुरखा घालण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, तर त्या तीन बुरखे घालतील.
उषा काकडे यांच्यासोबतच्या एका पॉडकास्टमध्ये शबाना आझमी यांनी धार्मिक मुद्द्यांवर चर्चा केली. या पॉडकास्टदरम्यान, अभिनेत्रीने महिलांच्या बुरखा घालण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, कुराणमध्ये बुरखा घालणे अनिवार्य नाही. त्यात फक्त एवढेच सांगितले आहे की, व्यक्तीने इतरांच्या नजरेत शालीनता आणि सभ्यता राखावी आणि हा नियम पुरुष व महिला दोघांनाही लागू होतो. आझमी पुढे म्हणाल्या की, काही मध्यस्थांनी धर्माच्या नावाखाली संभ्रम पसरवला आहे आणि जनतेसमोर खोटी धार्मिक शिकवण सादर केली जात आहे.
हे ही वाचा
शबानाच्या मते, काही मध्यस्थांनी धर्माच्या शिकवणी चुकीच्या पद्धतीने मांडल्यामुळे लोकांमध्ये हा संभ्रम निर्माण झाला आहे. शबाना म्हणाल्या, "मी बुरखा घालत नाही, पण जर कोणी मला सांगितले की मी एक घालू शकत नाही, तर मी तीन घालेन. तुम्ही मला हे सांगणारे कोण? पण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कट्टरतावाद पसरवणे देखील शक्य नाही." अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, "जर तुम्हाला धैर्य दाखवायचे असेल, तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालून ते दाखवा. स्वतःला मुक्त करायला शिका, स्वतःला कैद करायला नाही."
2022 मध्ये, कर्नाटकातील उडुपी येथील महाविद्यालयात हिजाब घातल्यामुळे सहा विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आल्याच्या आरोपांवर शबाना आझमी यांनी आपले मत व्यक्त केले होते. कंगना रणौतनेही या विषयावर आपले मत व्यक्त केले होते की, महिला स्वतंत्र असाव्यात, त्यांना कैद करून ठेवू नये. यानंतर, शबाना आझमी यांनी उत्तर दिले की, भारत एक लोकशाही देश आहे, त्यामुळे कोणालाही काहीही घालण्यापासून रोखता येणार नाही. या मुद्द्यावरूनही व्यापक चर्चा झाली होती.