'...पण यासाठी तुला माझ्यासोबत झोपावे लागेल', दिग्दर्शकाची 18 वर्षीय अभिनेत्रीला ऑफर; 'कल्पना कर, तो म्हातारा...'
वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी म्हणजेच 2009 मध्ये मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या या अभिनेत्रीने अचानक मोठ्या पडद्यावरुन एक्झिट का घेतली याबद्दलचा खुलासा करताना तिच्यासोबत घडलेला एक विचित्र प्रसंग सांगितला आहे. ती नेमकं काय म्हणाली ते पाहूयात...
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निती टेलरने तिला आलेला कास्टिंग काउचचा एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. एका तेलुगू चित्रपट दिग्दर्शकासोबत काम करताना आपल्याकडून कामाच्या मोबदल्यात लैंगिक सुखाची मागणी करण्यात आल्याचं या अभिनेत्रीने म्हटलं आहे.
लैंगिक संबंधांची मागणी केल्यामुळे चर्चा फिस्कटली
या घटनेमुळेच आपण चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि टीव्हीवरील भूमिकांवर लक्ष्य केंद्रीत केल्याचंही नितीने सांगितलं. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत नितीने हा धक्कादायक अनुभवाबद्दल बोलताना, एका भूमिकेची ऑफर देण्याच्या बदल्यात त्या दिग्दर्शकाने तिच्याकडे एक अयोग्य मागणी केली होती, असं नमूद केलं. 2012 ते 2014 या काळात तीन तेलुगू चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नितीने, तिच्या पहिल्या चित्रपटाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या दिग्दर्शकाने तिला एका दुसऱ्या प्रोजेक्टसाठी संपर्क साधला होता, असं सांगितलं. मात्र, नितीने दावा केला की, त्या भूमिकेच्या बदल्यात दिग्दर्शकाने लैंगिक संबंधांची मागणी केल्यामुळे त्यांच्यातील चर्चा फिस्कटली.
ऑफर ऐकल्यानंतर तिने काय केलं?
"ज्या दिग्दर्शकासोबत मी पहिला चित्रपट केला होता, त्यानेच दुसऱ्या चित्रपटासाठी मला बोलावले होते. '...पण यासाठी तुला माझ्यासोबत झोपावे लागेल', असं तेव्हा तो मला दुसरा चित्रपट ऑफर करताना म्हणालेला," असं निती ही आठवण सांगताना म्हणाली. त्या कथित प्रस्तावावर तिने कशी प्रतिक्रिया दिली हे देखील नितीने सांगितलं. "अशावेळी तुम्हाला काहीच समजत नाही, नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही. मी फक्त फोन कट केला, त्याचा नंबर ब्लॉक केला आणि माझ्या आईला फोन करून सांगितले—'कल्पना कर, तो म्हातारा माणूस...' असं म्हणत नितीला पुढचं वाक्यही हा अनुभव सांगताना पूर्ण करता आलं नाही.
मी कधीच असा विचार केला नव्हता
"मी त्या दिग्दर्शकाला इतर अभिनेत्रींसोबत पाहिले होते, पण तो आपल्याकडे अशी मागणी करेल अशी अपेक्षा मी कधीच केली नव्हती. त्यामुळेच त्यावेळी मी याबद्दल इतर कोणाशीही चर्चा केली नव्हती. मी घडलेल्या प्रकारामुळे पूर्णपणे हादरून गेले होते," असंही निती म्हणाली. या मुलाखतीदरम्यान नितीने त्या दिग्दर्शकाचे नाव उघड केले नाही.
तिचे गाजलेले चित्रपट कोणते?
नितीने वयाच्या 18 व्या वर्षी 2012 मध्ये 'मेम वयसकु वाचम' या तेलुगू चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्रिनाधा राव नक्किना दिग्दर्शित या चित्रपटात तनिष मुख्य भूमिकेत होता आणि हा चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी ठरला होता. त्यानंतर नितीने 2013 मध्ये 'पेल्ली पुस्तकम' या चित्रपटात काम केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन रामकृष्ण मचाकांती यांनी केले होते आणि ज्यात राहुल रवींद्रन मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष प्रभाव पाडू शकला नाही. तेलुगू चित्रपटांनंतर नितीने टेलिव्हिजन अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. ती शेवटची 'अलायन्स'मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती.