टायगर श्रॉफवरील हल्ल्याने अक्षय कुमार घाबरला! घेतला मोठा निर्णय, आता...
अभिनेता टायगर श्रॉफवर 18 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये हल्ला करण्यात आल्यानंतर मागील तीन दिवसांमध्ये बरीच माहिती समोर आली असून या प्रकरणात नवे खुलासे होत असतानाच हल्ल्याचा धसका अक्षय कुमारने घेतल्याचं दिसत आहे.
अभिनेता टायगर श्रॉफवर 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ला प्रकरणातील चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हल्लेखोरांनी टायगरवर गोळीबार करण्यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेता सलमान खान, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेता आमिर खान यांच्या घराची रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र टायगरला लक्ष्य करणं सहज शक्य असल्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला. मात्र आता या माहितीनंतर अभिनेत्यांनी धसका घेतला असून अक्षय कुमारने मोठा निर्णय घेतला आहे. एवढ्यावरच न थांबता एआय तंत्रज्ञान वापरण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत.
अक्षय कुमारने घेतला धसका
टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणाचा खिलाडी अक्षय कुमारनंही धसका घेत आता स्वत:ची सुरक्षा वाढवण्याचं ठरवलं आहे. अक्षय कुमारने राहत्या घरी सलमान खानच्या घराप्रमाणे बुलेट प्रुफ काचा लावण्याचं काम सुरु केलं आहे. सलमान खानच्या घरावर यापूर्वीच बुलेट प्रुफ काचा लावण्यात आल्या होत्या त्या आता अपग्रेड करण्यात आल्या आहेत. सलमानच्या घरावर 2024 मध्ये बिश्नोई टोळीतील गुंडांनी पाच गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर सलमानने घराची सुरक्षा वाढवताना बुलेट प्रूफ काचा लावून घेतल्या. तसाच निर्णय आता अक्षयने घेतला असून यासंदर्भातील कामही सुरु केलं आहे.
आमिर खानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली
दरम्यान, आरोपींनी अनेक कलाकारांच्या घराची रेकी केल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी या सेलिब्रिटींच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली आहे. अक्षय कुमारच्या घराबाहेर अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच अभिनेता आमिर खानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आमिर खानच्या 'फ्रीडा वन अपार्टमेंट' बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सलमानच्या घराबाहेर अनेक बदल
सलमान राहत असलेल्या 'गॅलेक्सी अपार्टमेंट' बाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमानच्या घराबाहेर दोन तात्पुरत्या पोलीस चौकी उभारण्यात आल्या आहेत. तसेच बुलेटप्रूफ जॅकेट असलेले पोलीस तैनात करण्यात आले असून त्यांना आता आधुनिक एमपी5 सबमशीन गन्स देण्यात आल्या आहेत. 2024 साली सलमानच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतरच त्याला सरकारकडून प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सलमानच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांच्या चार कमांडोंसहीत एकूण 11 ते 12 जवान तैनात असतात. तसेच सलमानच्या 'गॅलेक्सी अपार्टमेंट'मधील घराबाहेर कडेकोट पहारा असतो. त्याचप्रमाणे सलमान घराबाहेर पडतो तेव्हा त्याच्या कारसोबत एस्कॉर्ट वाहन आणि खासगी सुरक्षा रक्षकांचेही कडे असते. बॉडीगार्ड शेरा आणि त्याची टीम सलमानला खासगी सुरक्षा देते.