10 दिवसांपूर्वीच बाळाला जन्म, पतीकडे केलेली एक मागणी जीवावर बेतली, 14 वर्षांच्या विवाहितेची पतीकडून हत्या
ईराणमध्ये 14 वर्षीय मुलीची तिच्याच पतीने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
ईराणमध्ये एक 14 वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे तिच्याच 20 वर्षीय पतीने बेदम मारहाण करत तिचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. सोगंद मुश्तारेकी असं या तरुणीचे नाव असून 10 दिवसांपूर्वीच तिने बाळाला जन्म दिला होता. 6 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे.
ईराणच्या नॅशनल काउंसिल ऑफ रेजिस्टेंस महिला समितीने दिलेल्या माहितीनुसार, सोगंद हिच्या पतीचे वय 20 वर्ष आहे. तर, तिचे वयाच्या 13व्या वर्षी लग्न झाले होते, 10 दिवसांपूर्वीच तिने बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर तिला माहेरी जायचं होतं. मात्र पतीने तिला माहेरी जायला विरोध केला. यावरुन त्यांच्यात वाद झाले. या वादातूनच सोगंदवर तिच्या पतीने मारहाण केल्याचा आरोप आहे.
सोगंदच्या वडिलांनी आरोप केला आहे की, तिचा पती आमच्याशी बोलत नव्हता. तिलासुद्धा आमच्याशी बोलू दिले जात नव्हते. तिला घरात बंद करुन ठेवले जायचे. काही दिवसांपूर्वीच तिचा अपघात धाला होता. त्यानंतर लगेचच तिची डिलिव्हरी झाली. ती या दुहेरी यातनेतून जात होती. ती खूपच अशक्त झाली होती. जखमी असतानाच तिने बाळाला जन्म दिला होता. त्यामुळं तिला तिच्या माणसांची गरज होती.
सोगंदच्या वडिलांनी पुढे सांगितले की, डिलिव्हरीला 10 दिवस झाल्यानंतर तिला खूपच त्रास होऊ लागला. त्यानंत तिने 6 नोव्हेंबरला हिम्मत गोळा करुन तिच्या पतीला माहेरी जायचंय असं सांगितले. त्यानंतर तिचा पती चिडला आणि क्षुल्लक कारणासाठी तिला मारहाण केली. जबर मारहाणीमुळं तिचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी पतीने त्याचा गुन्हा कबुल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मात्र इराणमध्ये घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. इतक्या लहान वयात मुलींचे लग्न लावले जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झालं आहे.
सोगंदप्रमाणे आणखी एका गर्भवती महिलेचा जीव घेण्यात आल्याची घटना इराणमध्ये उघडकीस आली आहे. सोगंदला मारहाण झाल्याच्या दिवशीच इराणच्या फार्स प्रांतात सेपिदेह रायसी या 21 वर्षीय गर्भवती महिलेचीही तिच्या पतीने हत्या केली होती.
सेपिदेहवरही वयाच्या 13 व्या वर्षी लग्नासाठी दबाव टाकण्यात आला आणि तिला अनेक वर्षे कौटुंबिक हिंसाचार सहन करावा लागला. सेपिदेहला एक 3 वर्षांचा मुलगा आहे आणि ती 4 महिन्यांची गर्भवती होती. रोजच्या हिंसाचाराला कंटाळून जेव्हा तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिच्या पतीने तिला गोळ्या घालून ठार केले. या हल्ल्यात सेपिदेह आणि तिच्या पोटातले बाळ ठार झाले आहे.