महागाईने आधीच सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडवले असताना आगामी काळातही वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नोव्हेंबर 2026 च्या मासिक आर्थिक आढाव्यात महागाईबाबत चिंता व्यक्त केलीय. सणासुदीचा काळ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणे, लग्नसराईमुळे वाढणारी मागणी, हवामानातील अनिश्चितता आणि एल निनोचा संभाव्य प्रभाव यामुळे महागाईवर दबाव राहू शकतो, असे मंत्रालयाने म्हटलंय. याचा परिणाम घरखर्चावर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, व्याजदरांमध्ये वाढ झाल्यास गृहकर्ज आणि इतर कर्जांचे हप्तेही वाढू शकतात. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
किरकोळ महागाई मोजण्यासाठी ग्राहक किंमत निर्देशांकाचा (CPI) वापर केला जातो. ऑक्टोबर 2026 मध्ये हा महागाई दर 6.9 टक्क्यांवर पोहोचला. सप्टेंबरमध्ये तो 5.54 टक्के होता. म्हणजेच एका महिन्यात महागाईत 0.55 टक्क्यांची वाढ झाली. विशेष म्हणजे, हा दर रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या 2 ते 6 टक्क्यांच्या मर्यादेच्या वर गेला आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीतील वाढ हे त्यामागील प्रमुख कारण सांगितले जात आहे.
नोव्हेंबरमध्ये सणासुदीचा काळ सुरू राहणे आणि लग्नसराईला सुरुवात होणे यामुळे अन्नधान्य तसेच बिगरखाद्य वस्तूंची मागणी वाढू शकते, असे अर्थमंत्रालयाच्या आढाव्यात म्हटलंय. मागणी वाढल्यास काही वस्तूंच्या किमतींवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी महिन्यांतील महागाईचे आकडे वाढीच्या दिशेने जाऊ शकतात.
हवामानातील बदल हा महागाईसाठी आणखी एक चिंतेचा विषय आहे. जागतिक हवामान संघटनेने 2026 च्या अखेरीस एल निनोची तीव्र स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याचा पावसावर आणि शेती उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर पश्चिम आशियातील संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतुकीचा धोका यामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणि मालवाहतुकीचा खर्च अस्थिर राहू शकतो. याचा परिणाम भारतातील वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयने ऑक्टोबर 2026 मध्ये रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची वाढ करून तो 5.50 टक्क्यांवर नेला होता. रेपो दर वाढल्यास बँकांच्या कर्जदरांवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः रेपो दराशी जोडलेल्या फ्लोटिंग व्याजदराच्या गृहकर्जाचा ईएमआय किंवा कर्जाचा कालावधी वाढू शकतो.
महागाई वाढल्यास किराणा, इंधन, वाहतूक आणि दैनंदिन गरजांवरील खर्च वाढू शकतो. त्यामुळे कुटुंबांनी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे, आपत्कालीन निधी तयार ठेवणे आणि कर्जाच्या व्याजदरातील बदल तपासणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. असे असले तरी कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलच्या खाली येणे आणि रुपया मजबूत होणे यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असेही अहवालात नमूद केले आहे.