MS Dhoni New Home At Ranchi : भारताचा माजी क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी याने नुकतीच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. आता तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा मेंटॉर म्हणून दिसणार आहे. एम एस धोनी हा मूळचा रांची झारखंड येथील असून त्याच्या क्रिकेट करिअरची सुरुवात सुद्धा या छोट्याश्या शहरातून झाली. पुढे जाऊन त्याने भारताचे नेतृत्व करत असताना तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिल्या. रांचीमध्ये याआधी एम एस धोनीची दोन घरं असून आता एम एस धोनीचं तिसरं घर सुद्धा रांचीमध्येच आहे. धोनीचं हे नवं घर एका डोंगर टेकडीवर बनत असून रिपोर्ट्सनुसार या घराचं बजेट हे जवळपास 40 कोटी इतकं असणार आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात एम एस धोनी हा हे घर बनत असताना पाहायला गेला असल्याचे दिसते.
कुठे कुठे आहेत धोनीची घरं?
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने वर्ष 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रांचीमध्ये याआधी सुद्धा धोनीची दोन घरं आहेत. यातील पहिलं घर हे रांचीच्या हरमू येथे तर सध्या धोनी राहत असलेलं घर हे सिमरिया भागात आहे. तर धोनीचं बांधकामाधीन असणारं नवं घर हे रांचीच्या रिंग रोड येथील सेंबो भागात असून त्याच्या घराच्या जमिनीचा प्लॉट 822, 1314, 1322 आणि 1324 मध्ये पसरलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धोनीचे नवीन घर 2 एकरच्या भूखंडावर बांधले जात आहे. हे घर रांची रिंग रोडजवळील 'सॅम्बो हिल' येथे स्थित असून, धोनीने नुकतीच या जागेला भेट दिली होती. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करताना दिसत आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे 40 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. असे मानले जाते की धोनीच्या या नवीन घरामध्ये एक खाजगी जिम, स्विमिंग पूल आणि इनडोअर खेळांसाठी एक स्वतंत्र जागा असेल. तसेच त्याच्या घोड्यांसाठी आणि इतर पाळीव प्राण्यांसाठीही तिथे स्वतंत्र व्यवस्था असेल अशी अपेक्षा आहे. एम एस धोनी सध्या राहत असलेलं फार्म हाऊस हे कैलाशपतिच्या नावाने ओळखलं जातं. हे फार्म हाऊस 7 एकरमध्ये पसरलेलं असून यात क्रिकेट प्रॅक्टिससाठी नेट, स्विमिंग पूल, जीम, बाईक्ससाठी मोठी पार्किंग इत्यादी आहेत.