उड्डाण घेताच विमानाचा अपघात, गजबजलेल्या रस्त्यावरच कोसळले विमान, 9 ठार, काळजाचा ठोका चुकवणारा लाईव्ह Video
फ्लोरिडामध्ये रविवारी एक बिझनेस जेट विमानाचा अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.
अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये भयंकर विमान अपघाताची घटना घडली आहे. एक बिझनेस जेट भररस्त्यात कोसळल्याने एक हाहाकार उडाला होता. या दुर्घटनेत विमानातील सर्व 9 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेवेच परिवहन सचिव शॉन डफी यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'लियरजेट 60' हे विमान टेक्सासच्या ऑस्टिन येथून बहामास येथे जात होते. डफी यांनी पुढे म्हटलं री, फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA)चं एक पथक लगेचच घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य हाती घेण्यात आलं होतं. तसंच, या पथकाकडून दुर्घटना कशी घडली, याची चाचपणी करण्यात येणार आहे.
विमानात 9 प्रवासी होते. रविवारी हे विमान दक्षिण फ्लोरिडातील एका गजबजलेल्या रस्त्यावर कोसळले. या अपघाताचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. विमान जमीनीवर कोसळताच मोठा धमाका झाला आणि क्षणातच आगीचा मोठा लोळ उठला. सुदैवाने, रस्त्यालगत असलेल्या घरांना कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, जिथे विमान कोसळले त्या रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाला आहे.
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान टेक्सासच्या ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम इंटरनॅशनल एयरपोर्टहून बेहमाससाठी रवाना झाले होते. मात्र विमानातील ते 9 प्रवासी कोण होते याची ओळख मात्र अद्याप पटवण्यात आली नसून हे विमान खासगी असल्याचे समोर येतेय.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल
कारमधून बसलेल्या एका व्यक्तीने हा थरार कॅमेऱ्यात कैद केला आहे. व्हिडिओत स्पष्ट दिसतंय, की विमान आकाशातून वेगाने खाली कोसळतंय आणि रस्त्याला धडकलंय. त्यानंतर विमान रस्त्यावर कोसळताच मोठा आवाज झाला आणि मोठे आगीचे लोळ उठले. त्यानंतर रस्त्यावर मोठा खड्डादेखील पडला. त्यानंतर जवळपास कित्येक तास आग तशीच धगधगत होती.
गजबजलेल्या रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांपासून अवघ्या काही इंच अंतरावरच विमान कोसळले. या दुर्घटनेनंतर परिसरात धुराचे लोट पसरले होते. अद्याप या दुर्घटनेत तेथील घरांना काही नुकसान झालंय का? याबाबत मात्र अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. हा अपघात मिलिट्री ट्रेल आणि 10 एवेन्यू नॉर्थजवळ घडला असून या घटनेनंतर दोन्ही कडून रस्ता बंद करण्यात आला होता. तसंच, वाहन चालकांना त्या रस्त्यावर वाहने नेण्यास बंदी घालण्यात आली होती.
दरम्यान, त्याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर साधारण दोन तास वीज गायब होती. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येत आहे.