थायलंड दुर्घटना : थायलंडमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या फुकेत येथे मोठी दुर्घटना घडली आहे. आगीत होरपळून एकाचवेळी 11 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. 36 पेक्षा अधिक लोक या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. अचानक इमारतीला आग लागल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे एकचळ खळबळ उडाली आहे.
फुकेत हे थायलंडमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची मोठी वर्दळ असते. फुकेतच्या पातोंगमध्ये पहाटेच्या वेळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मध्य रात्री ही घटना घडली. यामुळे बहुतांश लोक झोपेत होते. झोपलेल्या रहिवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या भीषण दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास 36 जण यात जखमी झाल्याचे समजते.
स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फुकेतमधील एका बहुमजली इमारतीत पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. तळमजल्यावर मोटारसायकल भाड्याने देण्याचे दुकान होते. तर वरच्या मजल्यांवर रहिवासी राहत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला यश आले. स्थानिक प्रशासनाने सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र, फुकेट पोलीस कमांडर सुराचाई सुकसाई यांनी प्राथमिक कारण सांगितले आहे. आग लागण्याच्या काही वेळापूर्वी इमारतीजवळील एका विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला होता असे प्राथमिक तपासात असे दिसून आल्याचे फुकेट पोलीस कमांडर सुराचाई सुकसाई यांनी सांगितले.
फुकेटचे गव्हर्नर चोडनारिन कोएडसोम यांनी देखील या अपघाताची दुर्घटनेची माहिती घेतचली. तळमजल्यावर असलेल्या भाड्याच्या दुकानात सुमारे 100 मोटरसायकल उभ्या होत्या. याव्यतिरिक्त, तिथे मोठ्या प्रमाणात गॅस, इंजिन ऑइल, प्लास्टिकचे साहित्य आणि टायर देखील साठवलेले होते. या अत्यंत ज्वलनशील साहित्यामुळे आग वेगाने पसरली आणि इमारतीत विषारी धूर पसरला अशी शक्यता गव्हर्नर चोडनारिन कोएडसोम यांनी व्यक्त केली.
इमारतीच्या चारही बाजूला आग पसरल्याने पीडितांनी आगीतून वाचण्यासाठी इमारतीच्या वरच्या मजल्यांवर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु धूर आणि आग वरच्या दिशेने पसरल्याने ते अडकले. बचाव पथकांनी तिसऱ्या मजल्यावरून एक मृतदेह बाहेर काढला, तर पाचव्या मजल्यावर 10 जणांचे मृतदेह आढळले. फुकेट हे दक्षिण थायलंडमधील एका बेटावर वसलेले असून जगभरातील पर्यटकांमध्ये ते खूप लोकप्रिय आहे.