अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणात मफलरवाला नेता कोण? हा प्रश्न महाराष्ट्रात गेले अनेक दिवस विचारला जात होता. अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत मोठमोठे गौप्यस्फोट केले. रोहित पवारांनी मफलरवाला नेता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले. ते या घातपातामागे नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान भाजपकडून यावर पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात असल्याचा संशय रोहित पवार यांनी याआधीही व्यक्त केला होता. या प्रकरणात संबंधित विमान कंपनीला संरक्षण देणारा एक प्रभावशाली नेता असल्याचा त्यांचा आरोप होता. त्यासाठी ‘मफलरवाला नेता’ हा उल्लेख चर्चेत आला होता. आज रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले. त्यांचा घातपाताशी संबंध नाही. पण विमान कंपनीच्या मालक असलेल्या व्हीके सिंग यांच्याशी असलेल्या पारिवारीक संबंधांमुळे ते रोहित सिंग यांना वाचवत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय.
पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे घेतली. त्यांच्या दाव्यानुसार, अजित पवार यांना रस्तेमार्गे बारामतीला जायचे होते. मात्र, या दोन्ही नेत्यांनी फोन करून त्यांना थांबण्यास सांगितले. एका नेत्याला महत्त्वाची फाइल घ्यायची असल्याने अजित पवार यांना मुंबईत थांबावे लागले आणि त्यानंतर विमानाने प्रवास करण्याचा निर्णय झाला, असा दावा रोहित पवार यांनी केला.
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास, एफआयआर आणि व्हीएसआर कंपनीच्या भूमिकेबाबत रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित कंपनीचे कामकाज थांबवावे, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. ब्लॅक बॉक्स आणि तांत्रिक तपासाच्या प्रक्रियेबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली.
रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. 'एका कार्यक्रमात जाण्याचा आणि अजित पवारांच्या अपघाताचा काय संबंध? एका फोटोवरून अपघाताचे कनेक्शन जोडणे चुकीचे आहे,' असे ते म्हणाले. रोहित पवार प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी अशा पत्रकार परिषदा घेत असल्याची टीकाही त्यांनी केली. 'आजपर्यंत त्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या; मात्र एकही ठोस पुरावा दिलेला नाही,' असा दावा बन यांनी केला.या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली असून ती चौकशी करेल, असे नवनाथ बन यांनी सांगितले. दुसरीकडे रोहित पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी पुन्हा उपस्थित केली आहे.