ट्रम्प तात्यांना मोठा धक्का! कट्टर विरोधक 40 लाख+ मतांनी जिंकला; मोदींनीही लगेच केलं अभिनंदन, संपूर्ण दक्षिण अमेरिका खंडावर होणार परिणाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का देणारा निकाल दक्षिण अमेरिका खंडातील एका मोठ्या देशात लागला आहे. याचा दिर्घकालीन परिणाम अमेरिकेच्या राजकारणात होईल असं सांगितलं जातंय. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...
ब्राझीलमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अगदीच अनपेक्षित निर्णय लागला आहे. येथे डाव्या विचारसरणीचे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचे कठोर टीकाकार लुईझ इनाशिओ लुला डि'सिल्वा यांचा पुन्हा विजय झाला आहे. विशेष म्हणजे या निकालाचा परिणाम केवळ ब्राझीलपुरता मर्यादीत राहणार नसून दक्षिण अमेरिका खंडातील राजकारणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लुला यांच्या विजयामुळे दक्षिण अमेरिका खंडात उजव्या विचारसरणीच्या पक्षांची घोडदौड थांबली असून हा विजय म्हणजे ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय.
असे पहिलेच राष्ट्रध्यक्ष ज्यांनी...
लुला यांचे प्रतिस्पर्धी सेनेटर फ्लाव्हिओ बोल्सोनारो यांच्याविरुद्ध लुला यांना 51.8 टक्के मते मिळाली. बोल्सोनारी यांनी निकालामध्ये प्राथमिक फेऱ्यांत आघाडी घेतली. मात्र, नंतर ते पिछाडीवर पडले. त्यांचा जवळपास 40 लाख मतांनी पराभ झाला. विशेष म्हणजे ब्राझीलमध्ये पुन्हा लोकशाही अस्तित्वात आल्यापासून अशाप्रकारे पहिल्या फेरीमध्ये पिछाडीवर राहून निवडणूक जिंकणारे लुला हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरे आहेत.
विरोधी उमेदवाराने तेच केलं जे त्याच्या वडिलांनी केलेलं
मात्र, बोल्सोनारो यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रविवारी मतदानाला दोन तास वेळ वाढवून देण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला होता. हा निकाल रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. बोल्सोनारो यांच्या पराभवामुळे ब्राझीलचा शेअर बाजार गडगडला. फ्लाव्हिओ यांच्या वडिलांनी, जैर बोल्सोनारो यांनी 2022 मध्ये लुला यांच्याविरोधातच निवडणूक लढली होती. तेव्हाही त्यांनी पराभव स्वीकारण्यास नकार दिला होता. सत्तेत राहण्यासाठी बंड पुकारण्याच्या आरोपाखाली त्यांना सर्वोच्च न्यायालयाने 27 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुला यांचे अभिनंदन केले आहे. लुला यांच्या बरोबर काम करायला आवडेल, असे मोदी यांनी 'एक्स' वरील पोस्टमध्ये नमूद केले. भारत आणि ब्राझीलमधील बहुआयामी धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल आणि विस्तारित करण्यासाठी लुला यांच्यासोबत मिळून काम करण्यास उत्सुक असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
ट्रम्प यांना हा मोठा धक्का कसा?
दक्षिण अमेरिका एकेकाळी डाव्या विचारसरणीचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात असे. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये येथील सात देशांमध्ये उजव्या विचारसरणीला यश मिळाले. त्यामुळेच हा केवळ ब्राझीलपुरता किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या लुला यांच्या वर्कर्स पार्टी पक्षासाठी महत्त्वाची घडामोड नाही. तर या विजयामुळे संपूर्ण दक्षिण अमेरिका आपल्या अधिपत्याखाली आणण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. लुला हे ट्रम्प यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या या विजयामुळे दक्षिण अमेरिकेतील उजव्यांच्या घोडदौडीला खीळ बसली आहे, असे सांगितले जात आहे. लुला यांच्या विजयाने दक्षिण अमेरिका खंडात सर्वत्र उजव्यांची सत्ता येण्यास आडकाठी तयार झाली आहे. अमेरिकेला अनुकूल असेल सरकार या ठिकाणी न आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनाही हा धक्का मानला जात आहे. अमेरिकेची संपूर्ण दक्षिण अमेरिकेवर पकड बसणे आता तितकेसे सोपे राहणार नाही.
तेलाचे साठे असलेला देश अमेरिकेने नुकताच घेतलाय ताब्यात...
दक्षिण अमेरिका खंडातील व्हेनेझुएला या तेलाचे साठे असलेल्या देशावर अमेरिकेने आपली पकड मजबूत केली आहे. इतकी की, तेथील तेलाचा व्यापार आता अमेरिकेच्या मर्जीने केला जात आहे. या घडामोडींच्या पाश्र्श्वभूमीवर ब्राझीलमध्ये लुला यांना पुन्हा विजय मिळणे लक्षणीय आहे.