SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

जगभर कोरोना पसरवण्यासाठी 'हा'च माणूस जबाबदार; 7 वर्षानंतर दिली कबुली! ₹75 कोटींसाठी त्याने वुहानमध्ये...

कोरोनाचा 2019 च्या डिसेंबरमध्ये सर्वात आधी चीनमधील वुहान येथे प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. मात्र त्यासंदर्भात जाणूनबुजून माहिती लपवण्यात आल्याची धक्कादायक कबुली एका खटल्यादरम्यान देण्यात आल्याने वुहान पुन्हा चर्चेत आलं आहे.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 20, 2026, 02:05 PM IST | Updated: Oct 20, 2026, 02:20 PM IST
Image Credit: (फोटो सोशल मीडिया आणि रॉयटर्सवरुन साभार)
Join

कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणाहून जगभरामध्ये झाला ते वुहान शहर पुन्हा चर्चेत आलं आहे. हे शहर चर्चेत येण्यामागे कारण ठरत आहे याच शहराचे माजी महापौर झोऊ शियानवांग! चीनमध्ये सध्या सरकारने भ्रष्टाचाराविरोधात मोहीम हाती घेतली असून या मोहिमेमध्ये कोरोना काळातील एक मोठा भ्रष्टाचार समोर आलाय. या प्रकरणामध्ये माजी महापौर झोऊ शियानवांग यांना दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

झोऊ शियानवांग यांनी काय केलं?

झोऊ शियानवांग हे 2018 ते 2021 या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये वुहानचे महापौर होते. 2019 साली वुहानमध्ये डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली तेव्हा झोऊ शियानवांग यांनी महत्त्वाची माहिती जाणूनबुजून लपवल्याचं समोर आलं आहे. कोरोना किती घातक आहे, त्याचा प्रादुर्भाव कसा पसरू शकतो याबद्दल माहिती देणाऱ्या ली वेनलियांग यांच्यासारख्या डॉक्टरांची मुस्कटदाबी करण्याचं काम झोऊ शियानवांग यांनी केलं. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव होत असतानाच दुसरीकडे झोऊ शियानवांग हे मोठ्या कार्यक्रमांना परवानग्या देत असल्याचे आरोपही करण्यात आले. झोऊ शियानवांग यांनी आणलेल्या दबावामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारला कोरोना प्रादुर्भावासंदर्भात सुरुवातीच्या टप्प्यातील पुरेशी माहिती दिली नव्हती, असंही सांगितलं जात आहे.

कोर्टाने काय म्हटलं?

झोऊ शियानवांग प्रमुख आरोपी असलेल्या भ्रष्टाचाराच्या या प्रकरणामध्ये 10 ऑक्टोबर 2026 रोजी हेनान प्रांतातील शांगक्यू इंटरमीडिएट पीपल्स कोर्टने अंतिम सुनावणी करताना आरोपीला दोषी ठरवलं. त्याला 14 वर्षांची शिक्षा सुनावताना,2003 ते 2025 या काळात झोऊ शियानवांग यांनी वुहानचे महापौर, हुबेई प्रांताचे उपराज्यपाल यासारख्या विविध पदांवर असताना कंपन्या व व्यक्तींना ठेकेदारी देण्यासाठी, व्यवसायिक परवाने आणि प्रशासकीय मंजुरी मिळवून देण्यासाठी नियमाबाहेर जाऊन मदत केली. या बदल्यात त्यांनी 60.5 दशलक्ष युआनपेक्षा (सुमारे 75 कोटी रुपयांहून अधिक) जास्त रक्कम लाच म्हणून स्वीकारल्याचा आरोपी सिद्ध होत असल्याचं सांगितलं.

...म्हणून शिक्षा कमी केली

या प्रकरणामध्ये झोऊ शियानवांग यांना 14 वर्षे तुरुंगवास आणि 50 लाख युआन दंड ठोठावण्यात आला. झोऊ शियानवांग यांनी गुन्हा कबूल केला आणि तपासात सहकार्य केले म्हणून शिक्षा काही प्रमाणात कमी करण्यात आल्याचंही कोर्टाने शिक्षा सुनावताना नमूद केलं.

कोरोनाच्या उत्पत्तीबाबतचं रहस्य आजही कायम

करोनाच्या सुरुवातीच्या काळात स्थानिक प्रशासनाने बरीच अत्यावश्यक माहिती दडवल्याचं समोर आलं आहे. तपासणीदरम्यान स्थानिक प्रशासनाने पूर्ण पारदर्शकता दाखवली नाही. तसेच वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमधील संशोधन व सुरक्षेबाबतही अनेक प्रश्न जगभरातून उपस्थित करण्यात आले. कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत अजूनही ठोस आणि निश्चित निष्कर्ष काढता आलेला नाही. या अपयशामागील मुख्य कारण हे चीनने पूर्ण डेटा न पुरवल्याचं आहे. कोरोना विषाणू मांस बाजारातून, प्राण्यांपासून की प्रयोगशाळेतून निर्माण झाला हे आजही पुराव्यानिशी स्पष्ट झालेलं नाही. असा डेटा लपवण्यात झोऊ शियानवांग सारखे अधिकारी कारणीभूत होते असं या प्रकरणातून तरी समोर आलं आहे.

जगाला मृत्यूच्या दाढेत ढकललं

कोरोनामुळे जगभरात 71 लाखांहून अधिक लोकांनी प्राण गमावले. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि अधिकृत आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. झोऊ शियानवांगसारख्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला नसता योग्य वेळी माहिती दिली असती तर कदाचित कोरोनाचा एवढा प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यातच रोखता आला असता. झोऊ शियानवांगसारख्या व्यक्तींच्या स्वार्थामुळे त्यांनी संपूर्ण जगाला कोरोनासारख्या महामारीच्या माध्यमातून मृत्यूच्या दाढेत ढकललं. आता झोऊ शियानवांग यांच्यासारखे इतरही अधिकारी या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेमध्ये समोर येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES