पैशांसाठी देशाशी गद्दारी... शत्रूला स्वत:च्या देशाचे Top Secret पुरवणारा चिनी गुप्तहेर सापडला; काय शिक्षा दिली पाहिलं का?
परदेशात असताना केलेल्या एका मैत्रीमुळे ही व्यक्ती अडकत गेली आणि या साऱ्या कथेचा शेवट आता मृत्यूदंडाच्या शिक्षेनं होणार आहे. नेमकं त्याच्यासोबत झालं काय? तो किती पैसे घ्यायचा? काय माहिती समोर आलीये जाणून घ्या...
दुसऱ्या देशासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली चीनमधील एक बड्या सरकारी अधिकाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. देशातील अतिशय गोपनीय माहिती पैशांसाठी विकल्याचा ठपका ठेवत ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याचं केवळ अडनाव जाहीर करण्यात आलं असून तो पूर्वी परदेशात होता. 'मा' असं या अधिकाऱ्याचं अडनाव असून तो परदेशात असतानाच तेथील एका गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात अडकला होता, असं सांगण्यात आलं आहे.
मैत्री केली अन् नंतर...
चीनच्या 'नॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ स्टेट सिक्रेट्स प्रोटेक्शन'शी संलग्न असलेल्या 'गोल्ड वॉल प्रेस'च्या (Gold Wall Press) अहवालानुसार, मैत्रीच्या माध्यमातून 'मा' ला इतर देशातील गुप्तचर यंत्रणेनं जाळ्यात ओढलं. 'मा' परदेशात असताना 'कैलिन'नावाच्या एका गुप्तचर एजंटने चिनी भाषा शिकण्याच्या बहाण्याने 'मा'सोबत मैत्री वाढवली. मैत्री वाढवताना अनेक विषयांवर या दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र 'कैलिन' अनेकदा राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषयांवर चर्चा करून आणि पैशांचे आमिष दाखवून 'मा' कडून माहिती काढून घेऊ लागला. पुढे नकार दिल्यास 'मा'ला ब्लॅकमेल करण्यात आलं. यापूर्वी दिलेल्या माहितीचा खुलासा चिनी अधिकाऱ्यांकडे करण्याची धमकी देत 'मा'ला हेरगिरी करण्यास भाग पाडण्यात आलं.
किती पैसे मिळायचे?
चीनमध्ये परतल्यानंतरही 'मा'ने परदेशी गुप्तचर वेबसाइट्सच्या माध्यमातून माहिती पुरवणे सुरूच ठेवले. परदेशी यंत्रणेने त्याला एक विशेष लॅपटॉप दिला होता. त्याने 100 हून अधिक गुप्त अहवाल परदेशी एजन्सीला पाठवल्याचा आरोप आहे. या 100 हून अधिक गुप्त अहवालांपैकी 35 अहवाल 'अतिशय गोपनीय' (Top Secret) श्रेणीतील होते. या बदल्यात त्याला 10 लाख युआन (सुमारे 1 कोटी 38 लाख रुपयांहून अधिक) रक्कम मिळाली होती. 'द गार्डीयन'ने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायालयाने 'मा' याला मृत्युदंडाची शिक्षा दिली आहे. त्याचबरोबर त्याची सर्व वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
मुद्दाम समोर आणली माहिती?
चिनी प्रशासनाने हा खटला इतर अधिकाऱ्यांसाठी एक धोक्याची घंटा असल्याचं जाहीर केल्याची चर्चा आहे. या प्रकरणामधून धडा घेऊन भविष्यात कोणीही परदेशी गुप्तचर संस्थांच्या आमिषाला बळी पडू नये, असं सूचित करण्यात आलं आहे. चीनमध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित खटल्यांची माहिती सहसा गुप्त ठेवली जाते. मात्र, इतर सरकारी अधिकाऱ्यांना परदेशी गुप्तचर यंत्रणांच्या आमिषांपासून सावध करण्यासाठी प्रशासनाने हा निकाल प्रसारमाध्यमांच्या मदतीने जगजाहीर केल्याचं सांगितलं जात आहे.