यवतमाळ : यवतमाळमध्ये आधी वृक्षतोडीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. प्रकल्पांच्या नावाखाली झरी जामणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप होत असतानाच या तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून चक्क कोकणात वृक्षलागवड केल्याचा धक्कादायक दावा मनसे नेते राजू उंबरकर यांनी केला. माहिती अधिकारातून ही बाब समोर आल्याचं त्यांनी सांगितले. वन विभागात नियम मनमानी पद्धतीने बदलले जात असून जमिनी बिल्डरांच्या घशात घातल्या जात असल्याचे गंभीर आरोपही उंबरकर यांनी केलेत. त्यामुळे वन विभागाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यवतमाळमधील वृक्षतोडीच्या प्रस्तावाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार संजय देरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. सरकारचं वृक्षतोडीचं धोरण चुकीचं असल्याचा घणाघात त्यांनी केला. एवढंच नाही तर या प्रस्तावाविरोधात आवाज उठवणार असून आगामी अधिवेशनातही हा मुद्दा ठामपणे मांडणार असल्याचा इशारा देरकर यांनी झी 24 तासच्या बातमीनंतर दिलाय. हजारो झाडांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून सरकार या वाढत्या विरोधाला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यवतमाळमधील रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पासाठी तब्बल 50 हजार झाडांची कत्तल करण्याच्या प्रस्तावासंदर्भातील बातमी झी 24 तासने दाखवल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होतोय.. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनीही या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी दिला जात असेल तर हा गंभीर विषय असल्याचं त्यांनी अधोरेखित केले. वृक्षतोड प्रस्तावाविरोधात आवाज उठवणार असल्याचंही जरांगेनी म्हटलं.
कर्जतमध्ये टोरंट प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या जखमा अजून ताज्या असतानाच, आता विदर्भात आणखी एका मोठ्या जंगलतोडीचा घाट घातला जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. यवतमाळमधील रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पासाठी जवळजवळ ५० हजार अतिरिक्त झाडांची कत्तल करण्याचा धक्कादायक प्रस्ताव पुढे आला आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करणारा, उद्याच्या बैठकीचा अजेंडा थेट 'झी २४ तास'च्या हाती लागला आहे! उद्या केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार असून, याच बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. उद्या नवी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत हा प्रस्ताव 9व्या क्रमावर चर्चेला ठेवण्यात आला आहे ... त्यामुळे महाराष्ट्रात बड्या प्रकल्पांसाठी पुन्हा एकदा हजारो झाडांचा बळी दिला जाणार का? कोणाच्या आशीर्वादाने हा पर्यावरणाचा सौदा मांडला जातोय? असे खळबळजनक सवाल आता उपस्थित केले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यात रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पासाठी आधीच ४६७.५ हेक्टर राखीव वनजमीन बहाल करण्यात आली आहे. यामध्ये पिंपरडवाड, हिरापूर आणि गोविंदपूर या तीन गावांतील जमिनीचा समावेश आहे. इतकंच नव्हे, तर ही वादग्रस्त जमीन टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यापासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर आहे! आधी आरेमधील वृक्षतोड, त्यानंतर कर्जतच्या भीमाशंकर अभयारण्यातील झाडांची कत्तल... आणि आता थेट यवतमाळमध्ये ५० हजार अतिरिक्त झाडांच्या कत्तलीचा हा प्रस्ताव! एकामागून एक जंगलांचा घास घेण्याचं हे सत्र नेमकं कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे? या धक्कादायक प्रकारामुळे आता संपूर्ण राज्यभर संतापाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.