जगाच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या एल निनो आणि ला निना या दोन महत्त्वाच्या नैसर्गिक हवामान प्रक्रियांकडे सध्या शास्त्रज्ञांचे लक्ष लागले आहे. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने सध्या एल निनो अधिक तीव्र होत आहे. त्यानंतर ला निना येणार का?, याबाबत चर्चा सुरू आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा अधिक गरम होण्याच्या प्रक्रियेला एल निनो म्हणतात. यामुळे जगभरातील वाऱ्यांची दिशा, पावसाचे प्रमाण आणि तापमानाच्या पद्धती बदलू शकतात. सध्या एल निनो अधिक मजबूत होत असून जानेवारी ते मार्च 2027 पर्यंत तीव्र स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
एल निनोच्या उलट स्थितीत प्रशांत महासागरातील पाणी सरासरीपेक्षा थंड होते. याला ला निना म्हणतात. मात्र, एल निनो संपला म्हणजे लगेच ला निना सुरू होतो असे नाही. दोन्ही घटनांच्या दरम्यान तटस्थ स्थितीही निर्माण होऊ शकते. 2027 च्या वसंत ऋतूपर्यंत एल निनो कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यानंतर परिस्थिती कशी बदलेल, हे पुढील निरीक्षणांवर अवलंबून असेल.
सामान्यतः एल निनोचा संबंध भारतातील कमकुवत मान्सूनशी जोडला जातो. मात्र, प्रत्येक एल निनो वर्षी दुष्काळ पडतोच असे नाही. भारतीय महासागरातील तापमान, इंडियन ओशन डायपोल (IOD) आणि इतर वातावरणीय घटकही पावसावर परिणाम करतात.
महाराष्ट्रातील खरीप पिके पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे भविष्यातील एल निनो-ला निना बदलांचा विचार करताना पावसाचे अधिकृत अंदाज, धरणांतील पाणीसाठा आणि स्थानिक हवामान सूचना यांना महत्त्व द्यावे. केवळ एल निनोच्या बातमीवरून पेरणी किंवा पीक नियोजनाचे निर्णय घेणे योग्य ठरणार नाही.
जागतिक हवामान संघटना म्हणजेच डब्ल्यूएओच्या मते, तीव्र एल निनोमुळे काही प्रदेशांत उष्णता, तर काही भागांत अतिवृष्टी किंवा दुष्काळाचा धोका वाढू शकतो. मात्र, त्याचा परिणाम प्रत्येक देशात आणि प्रदेशात वेगळा असतो. त्यामुळे भारतासाठी IMD आणि INCOIS चे नियमित अंदाज महत्त्वाचे ठरतील. एल निनोनंतर ला निना येणार की तटस्थ स्थिती राहणार, हे पुढील काही महिन्यांत स्पष्ट होणार आहे.