14 व्या वर्षी स्थापन केला स्वत:चा देश, 21 व्या वर्षी UN कडून पुरस्कार! हा तरुण कोण? त्याने स्थापन केलेला देश आहे कुठे? A To Z माहिती
लहानपणापासून असलेली भुगोलाची आवडत त्याला जगभरात प्रसिद्धी मिळवून देणारी ठरली आहे. हा तरुण आहे कोण? त्याने स्थापन केलेला देश आहे कुठे? त्याला का पुरस्कार देण्यात आलाय? जाणून घ्या सविस्तर माहिती...
दोन देशांमध्ये जमिनीच्या तुकड्यावरुन वाद झाल्याचं यापूर्वी तुम्ही अनेकदा ऐकलं, वाचलं असेल. पण ही जमीन आमची नाही म्हणत दोन्ही देशांनी एकाच भूभागावरील दावा सोडला तर? बरं मग अशा जागेचं करायचं काय यावरुन तिसऱ्याच व्यक्तीने आणि ते ही अगदी 14 वर्षीय व्यक्तीने येऊन या जागी नवीन देश वसवला तर? आता ही जर तरची गोष्ट तुम्हाला काल्पनिक वाटेल पण खरंच असं झालं असून मागील काही वर्षांपासून हा एक चिमुकला देश म्हणजेच मायक्रोनेशन जगभरात चर्चेत आहे. अर्थात या देशाला असून अधिकृत मान्यता मिळालेली नसून आधी ज्या देशाने या भूभागावरील दावा सोडलेला त्यापैकीच एका देशाने या नव्या देशाचा विरोध केला असून या भूभागात बॅरिगेटींग केलं आहे. हा देश कोणता? तो कोणी वसवलाय? त्याचं स्टेटस काय? याबद्दल जाणून घेऊयात सविस्तरपणे...
या देशाचं नाव काय?
तर ज्या देशाबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे वर्दिस! तर अधिकृत नाव आहे, 'द फ्री रिपब्लिक ऑफ वर्दिस'! क्रोएशिया आणि सर्बिया या दोन देशांच्या सीमेजवळ जमिनीचा एक असा तुकडा आहे, ज्यावर यापैकी कोणत्याही देशाचा दावा नाही. याच दोन्ही देशांनी नाकारलेल्या तुकड्यावर लहानपणापासून भूगोलाची आवड असलेल्या डॅनियल जॅक्सन ब्रिटीश-ऑस्ट्रेलियन तरुणाने वर्दिस हा देश स्थापन केला आहे. वयाच्या 14 वर्षी डॅनियलने ही घोषणा केली. या देशाची घोषणा 30 मे 2019 रोजी करण्यात आली. चार वर्षांनंतर म्हणजेच 2023 मध्ये ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या डॅनियलने आपल्या काही मित्र मिळून, व्हॅटिकन सिटीपेक्षा थोड्या मोठ्या असलेल्या या जागेवर एका नवीन राष्ट्राची घोषणा करत प्रत्यक्षात इथे पोहोचले. वर्दिस हे नाव लॅटिन भाषेतील 'हिरवा' या शब्दावरून ठेवण्यात आले आहे. या नावाच्या माध्यमातून या भूभागावर असलेल्या झाडांनाच दर्शवण्याबरोबरच एक पर्यावरणाबाबत जागरूक राष्ट्र घडवण्याची संस्थापकांची इच्छा असल्याचं सांगितलं जात आहे.
...तर ठरेल जगातील दुसरा सर्वात लहान देश
क्रोएशिया आणि सर्बिया यांच्यातील सीमावादामुळे डॅन्यूब नदीकाठच्या सुमारे 0.5 चौरस किलोमीटरच्या पॉकेट-थ्री नावाने ओळखल्या जाणाऱ्या जमिनीच्या तुकड्यावर हा देश वसवण्यात आला आहे. या भागावर दोन्ही देशांपैकी कोणाचाच दावा नसल्याने तिसऱ्यानेच येऊन त्यावर दावा सांगितला आहे. यापूर्वी ही जमीन दोन्ही देशांकडून कोणाचीही मालकी नसलेली म्हणजेच नो मॅन्स लँड म्हणून ओळखली जात होती. या ठिकाणी डॅनियल आणि त्याच्या मित्रांनी आपल्या कल्पनेतील वर्दीस देशाची घोषणा करुन 2023 मध्ये स्वत: केलेला ध्वज फडकवला. या देशाचं अगदी क्षेत्रफळ मोजून 0.501 चौरस किलोमीटर इतकं आहे. साधारण 123.8 एकर म्हणता येईल एवढा हा एरिया आहे. भविष्यात खरोखरच या देशाला अधिकृत मान्यता मिळाली, तर हा व्हॅटिकन सिटीनंतर जगातील दुसरा सर्वात लहान देश ठरू शकतो.
अधिकृत भाषा कोणती आणि राज्यव्यवस्था कशी चालते?
वर्दिसने 'युरो' हे आपले अधिकृत चलन म्हणून स्वीकारले असून देशाला तीन अधिकृत भाषा असल्याचं सांगण्यात आलं आहे. इंग्लिश, क्रोएशियन आणि सर्बियन भाषेला वर्दिसने राष्ट्रीय अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे. संस्थापकांनी केलेल्या दाव्यानुसार, वर्दिसमध्ये येथे घटनात्मक प्रजासत्ताक आणि थेट लोकशाही पद्धतीचे सरकार चालवले जाते. संस्थापक डॅनियल जॅक्सन हेच देशाचे अध्यक्ष आहेत.
नागरिक म्हणून आलेल्यांना हाकललं
वर्दिसने स्वतःचा पासपोर्ट, राष्ट्रध्वज आणि ई-रेसिडेन्सी सेवा सुरू केली आहे. जगभरातून सुमारे 15 हजारांहून अधिक लोकांनी या देशाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. त्यापैकी केवळ 400 जणांना वर्दिसकडून अधिकृत नागरिकत्व देण्यात आले आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये जेव्हा वर्दिसच्या संस्थापकासहीत नागरिकत्व मिळालेल्यांनी या जमिनीवर कायमस्वरूपी वस्ती उभारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा क्रोएशियाने त्यांना विरोध केला. क्रोएशियाच्या सुरक्षा दलांनी या कथित देशाच्या नागरिकांना तिथून हाकलून लावले आणि तिथे नाकेबंदी केली. सध्या क्रोएशियाच्या विरोधामुळे वर्दिसचे सरकार या मूळ भूमीवरून म्हणजेच या वादग्रस्त जमिनीवरुन काम करत नाहीये. या ठिकाणचं सरकार 'निर्वासित सरकार' म्हणून ब्रिटनमधील डोव्हर आणि सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथून आपले कामकाज चालवते.
संस्थापकाचा झाला सत्कार
याच महिन्यात म्हणजेच, ऑक्टोबर 2026 मध्ये वर्दिसचा संस्थापक डॅनियल जॅक्सनला एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. वयाच्या 14 व्या वर्षी देशाची घोषणा करुन वयाच्या 21 व्या वर्षी वर्दिस या मायक्रोनेशन दर्जाच्या देशाने मानवी हक्क आणि पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (UN) एका कार्यक्रमात एका संस्थेकडून डॅनियलला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.