SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

₹2800 चे झाले ₹13 कोटी... सहज मारलेल्या फेरफटक्याने झाला कोट्यधीश; वि'चित्र' घटना जगभर चर्चेत

देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो असं म्हटलं जातं. तर काहीजण आपल्याला किती पैसा, संपत्ती मिळणार हे नशिबावर असतं असं मानतात. मात्र या दोन्ही गोष्टी एका तरुणाला लागू होतात असा प्रकार त्याच्यासोबत घडलाय. नेमकं झालंय काय जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 09, 2026, 02:32 PM IST | Updated: Oct 09, 2026, 02:44 PM IST
Image Credit: जगभरात सध्या या चित्राची चर्चा आहे
Join

अमेरिकेमधील शिकागो येथील प्रसिद्ध महिला चित्रकार गर्ट्रूड ॲबरक्रॉम्बी यांचे एक चित्र सध्या चांगलेच चर्चेत आहे. खरं तर हे चित्र सात दशकांहून अधिक जूनं आहे. मात्र हे चित्र मागील अनेक दशकांपासून लोकांच्या नजरेआड होते, ते पुन्हा समोर आलं असून या चित्राच्या माध्यमातून एक तरुण रातोरात कोट्याधीश झाला आहे. अवघ्या 2800 रुपयांना हे चित्र विकत घेऊन ते आता 13 कोटी रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे. या रक्कमेतील फरक जेवढा थक्क करणारा आहे, तितकाच थक्क करणारा या चित्राचा प्रवास आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...

सहज गेलेला अन् हे चित्र घेऊन आला

अमेरिकेमध्ये 'इस्टेट सेल' नावाने वस्तूंची विक्री होते. यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर किंवा मालमत्ता विक्रीच्या वेळी घरातील वस्तूंची विक्री केली जाते. अशाच विक्रीममध्ये केवळ 30 डॉलर्सना खरेदी केलेले गर्ट्रूड ॲबरक्रॉम्बी यांचे हे चित्र आता 1.35 दशलक्ष डॉलर्सला विकले गेले आहे. 'अल्डरमन मेरियम्स शेल्स' (Alderman Merriam's Shells) असं या कलाकृतीचं नाव आहे. हे 1951 मधील चित्र अलीकडेच मिशिगनमधील कलामाझू येथे एका इस्टेट सेलमधून बऱ्याच दशकांनंतर जगासमोर आलं. हे चित्र खरेदी करणारा तरुण सहज या 'इस्टेट सेल'साठी पोहोचला होता. खरं तर तो 'विनाइल रेकॉर्ड्स' म्हणजेच जुने संगीत रेकॉर्ड्स या घरातील सामानामध्ये विक्रीसाठी आहेत का हे पाहण्यासाठी तो सहज फेरफटका मारत या 'इस्टेट सेल'मध्ये गेला होता. तेव्हा सामना तपासताना त्याला हे कलाकृती दिसली. त्याने ती कलाकृती उलटून पाहिली आणि त्याला मागील बाजूस एक नाव दिसले जे त्याला ओळखीचे वाटले. त्याने या चित्रासाठी केवळ 30 डॉलर्स म्हणजेच 2800 रुपयांच्या आसपास रक्कम मोजली.

13 कोटी रुपये मिळाले

त्यानंतर दीर्घकाळ हरवलेली ही कलाकृती लिलावात 1.35 दशलक्ष डॉलर्सला म्हणजेच 13 कोटी रुपयांना विकली गेली. या विक्रीचे व्यवस्थापन करणाऱ्या 'फ्रीमन्स ऑक्शन्स'च्या प्रवक्त्यानुसार, ॲबरक्रॉम्बी यांच्या कलाकृतीसाठीच्या लिलावातील हा एक नवीन जागतिक विक्रम ठरलाय. या चित्रात शिकागोचे नगरसेवक म्हणजेच स्थानिक भाषेत अल्डरमन रॉबर्ट मेरियम यांच्याकडील शंख-शिंपल्यांचा संग्रह दाखवण्यात आला आहे. मेरियम यांनी 1947 ते 1955 या काळात शहराच्या पाचव्या वॉर्डचे प्रतिनिधित्व केले होते. या वॉर्डमध्ये 'हाइड पार्क'चा समावेश होता, जिथे ॲबरक्रॉम्बी राहत होत्या आणि शिकागोच्या कला व संगीत क्षेत्रातील त्या एक प्रमुख व्यक्ती ठरलेल्या. तेव्हाचा हा काळ!

10 पट अधिक किमतीला विक्री

सुरुवातीला या कलाकृतीची किंमत 15000 ते 250000 डॉलर्सच्या दरम्यान मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात तिची किंमत 1.35 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचली. ही रक्कम अंदाजाच्या कमाल मर्यादेपेक्षाही कितीतरी अधिक होती आणि अपेक्षित मूल्याच्या वरच्या टप्प्यापेक्षा जवळपास 10 पट अधिक किमतीला ही कलाकृती विकली गेली.

कोणासाठी काढलेलं हे चित्र?

ॲबरक्रॉम्बी यांनी 1952 मध्ये वैद्यकीय सेवांच्या मोबदल्यात हे चित्र कलामाझू येथील डॉ. जॉन टी. रेनॉल्ड्स यांना भेट दिले होते. त्यानंतर 1952 आणि 1953 दरम्यान न्यूयॉर्क, शिकागो, मिलवॉकी आणि इव्हान्स्टन येथील प्रदर्शनांमध्ये 'अल्डरमन मेरियम्स शेल्स' नावाची ही कलाकृती प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. 1953 मध्ये शिकागो डिझाइन सेंटरमध्ये हे चित्र शेवटचे प्रदर्शित झाल्याचे माहिती समोर येत आहे. त्यानंतर, हे चित्र लोकांच्या नजरेआड झाले.

70 वर्षांहून अधिक काळानंतर, हे चित्र रेनॉल्ड्स यांच्या मालमत्तेच्या विक्रीदरम्यान (इस्टेट सेल) पुन्हा समोर आले. हे तेच डॉक्टर होते ज्यांना 1952 मध्ये ॲबरक्रॉम्बी यांच्याकडून हे चित्र मिळाले होते. लिलावात विक्रीस जाण्यापूर्वी, शिकागोस्थित 'बॉमगार्टनर फाइन आर्ट रेस्टोरेशन'द्वारे या चित्राचे जतन व दुरुस्ती करण्यात आली.

चित्रात आहे काय?

या चित्रात गडद पार्श्वभूमीवर अनेक शंख-शिंपले दर्शविले आहेत. एक शंख पूर्णपणे काळ्या पोकळीत तरंगताना दिसतो. प्रत्येक शंख त्याच्या स्वतःच्या प्रकाशस्रोताद्वारे प्रकाशित करण्यात आलाय. हे दिवे परस्पर-विरुद्ध कोनांत ठेवल्यामुळे एक गूढ आणि स्वप्नवत परिणाम साधला गेल्याचं चित्र निरीक्षक सांगतात.

या चित्राला एवढं महत्त्व का?

तज्ञांच्या मते, 'अल्डरमन मेरियम्स शेल्स' हे ॲबरक्रॉम्बी यांच्या कलात्मक कारकिर्दीतील एक महत्त्वाची कलाकृती आहे. त्या काळात ॲबरक्रॉम्बी यांनी 'अतिवास्तववाद' (surrealism) शैलीचा अधिक स्वीकार केला होता. पहिल्या नजरेत ही कलाकृती साध्या 'स्टिल लाइफ' म्हणजेच निर्जीव वस्तूंचे चित्रण करणारी वाटते, परंतु बारकाईने पाहिल्यास त्यातील रचना अधिक गूढ असल्याचे दिसून येते, असं चित्रकला क्षेत्रातील जाणकार सांगतात.

ही कलाकृती आणखी एका कारणामुळे महत्त्वाची आहे. यात ॲबरक्रॉम्बी यांच्या 'तडा गेलेल्या शंखा'च्या आकृतिबंधाचे सर्वप्रथम दर्शन घडते. हा घटक त्यांच्या नंतरच्या कलाकृतींमध्ये वारंवार दिसून आला. या घटकाचं मूळ म्हणून या कलाकृतीकडे पाहिलं जातं. ॲबरक्रॉम्बी यांचे 1977 मध्ये निधन झाले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES