SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका, सरकारी कार्यालयांची जाळपोळ, 'या' मागण्यांसाठी 5 लाख नागरिक रस्त्यावर उतरले

फ्रान्सभर पसरलेल्या देशव्यापी निदर्शने आणि नागरी अशांततेदरम्यान बोर्डोमधील लुई व्हिटॉनच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 18, 2026, 11:28 AM IST | Updated: Oct 18, 2026, 11:29 AM IST
Image Credit: France protests
Join

भारतात गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलनांचा हुंकार भरला. दिल्ली ते गल्लीपर्यंत जेन-झींचा एल्गार पाहायला मिळतो. भारताप्रमाणेच आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. आत्तापर्यंत साधारण 1200 जणांना अटक करण्यात आली आहे. तर, 150 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

फ्रान्समध्ये वाढती महागाई, वाईट सार्वजनिक सेवा आणि शाळांची बिकट अवस्था याविरोधात शनिवारी 17 ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली. पॅरिससह अनेक शहरात मोर्चे काढण्यात आले. त्यामुळं देशात तणावाचं वातावरण आहे. तसंच, या दरम्यान आंदोलनकर्ते आणि पोलिसांत झटापटीदेखील झाल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी दुकानात तोडफोड आणि लूटमार करण्यात आली. तर, काही इमारतींना आग लावण्यात आली. फ्रान्सचे पंतप्रधान सेबेस्टियन लेकोर्नू यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचारानंतर 1200 जणांना अटक करण्यात आले आहे तर 150 पोलिस जखमी झाले आहेत.

फ्रान्सचे गृहमंत्री लॉरेंट नुनेज यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात जवळपास 5.5 लाख लोक आंदोलनात सहभागी झाले होते. यातील 1.1 लाख लोक पॅरिसमध्ये रस्त्यावर उतरले होते. तर, आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्या पक्षांनी व संघटनांनी दावा केला होता की, आंदोलनात साधारण 8 लाख लोक सहभागी झाले होते.

पॅरिसमधील मुख्य मोर्चा दिवसभर मोठ्या प्रमाणात शांततेत पार पडला, परंतु संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी परिस्थिती बिघडली. काही आंदोलकांनी रस्त्यांवर आग लावली आणि वाहनांचे नुकसान केले. प्लास दे ला रिपब्लिकच्या (Place de la République) परिसरात जाळपोळ आणि पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचेही समोर आले आहे.

गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर आणि पाण्याचा मारा केला. काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्जही केला. अनेक दुकाने आणि मोठ्या शोरुममध्ये तोडफोड व लूटमार करण्यात आल्याचा दावादेखील केला जातोय.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जाळपोळ, लूटमार आणि सरकारी इमारतींवरील झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. हिंसाचार आणि तोडफोडीत सहभागी असलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. कोणालाही हिंसेच्या माध्यमातून आपला राजकीय अजेंडा पुढे नेण्याची परवानगी दिली जाऊ नये, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी दिली.

फ्रान्समध्ये आंदोलन का?

शाळांची दयनीय अवस्था आणि शिक्षकांची कमतरता यावरून या आंदोलनाची सुरुवात झाली. हळूहळू त्यात महागाई, इंधनाच्या किमती, आर्थिक अडचणी आणि सार्वजनिक सेवांची दुरावस्था यांसारख्या मुद्द्यांचा समावेश झाला. कामगार संघटनांनी सुधारित वेतन आणि निवृत्तीवेतन तसेच अत्यावश्यक सेवांच्या तरतुदीच्या मागण्यांना पाठिंबा दिला. या मुद्द्यांवरुन फ्रान्समध्ये आंदोलन पेटले आहे.

सर्वच आंदोलकांनी हिंसाचार केला नाही. अनेक शहरांमध्ये, मोठ्या संख्येने लोकांनी शांततेने मोर्चे काढले. काही भागांमध्ये हिंसाचार झाला, ज्यात पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमकी झाल्या, ज्यामुळे दुकाने आणि सरकारी इमारतींचे नुकसान झाले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES