2014 पासून सत्तेत असलेल्या नेत्याला Gen Z ने निवडणुकीत पाडलं; विद्यार्थी आंदोलनाचं अभूतपूर्व यश, विक्रमी मतदानानंतर सत्तांतर
मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं असून देशात मागील 12 वर्षांपासून सत्तेत असलेल्या नेत्याला विद्यार्थ्यांसमोर नमतं घ्यावं लागलं आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये मतदानाचे सर्व विक्रम मोडले गेले.
जगातील अनेक देशांमध्ये मागील काही काळापासून सातत्याने सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पहिलं राजकीय यश मिळालं आहे. विशेष म्हणजे हे यश एवढं मोठं आहे की या विद्यार्थ्यांनी चळवळीच्या माध्यमातून राजकारणात उडी घेतली आणि 2014 पासून सत्तेत असलेल्या अध्यक्षांना पराभूत करण्याचा पराक्रम केला. जेन झी आंदोलनाचं जगातील हे पहिलं सर्वात मोठं राजकीय यश मानलं जात आहे.
2024 पासून सत्तेत अलेल्या नेत्याचा पराभव
हा सारा प्रकार घडला आहे सर्बिया या दक्षिण युरोपातील देशामध्ये! या देशातील राजकारणावर 2014 पासून पकड असणारे अध्यक्ष अलेक्झांडर व्हूचिच यांनी संसदीय निवडणुकीतील आपला पराभव मान्य केला आहे. त्यामुळे मागील 12 वर्षांपासूनची व्हूचिच यांची सत्ता संपुष्टात येणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. देशातील भ्रष्टाचार, एकाधिकारशाहीविरोधात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला व्हूचिच यांच्या पराभवाने यश आले आहे. व्हूचिच यांच्यानंतर पुढील अध्यक्ष कोण असेल, या बाबत मात्र अद्याप संभ्रम कायम आहे.
मतदानाचे सर्व विक्रम मोडले
विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांच्या आंदोलनानंतर सर्बियामध्ये निवडणुका पार पडल्या. युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर पहिल्यांदाच देशातील सार्वत्रिक निणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालं. आधीचे सर्विक्रम मोडीत काढत सर्बियातील लोकांनी सर्वाधिक 70 टक्क्यांहून अधिक मतदान केलं. व्हूचिच यांच्याकडे 2014 पासून सर्बियाची सूत्रे होती.
हजारो विद्यार्थ्यांचा रस्त्यावर येऊन जल्लोष
विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर 'प्रिय सर्बिया, आज रात्री लोकांचा आवाज ऐकला जाईल. आज रात्री आपण विजय साजरा करू आणि उद्यापासून देशाचे भवितव्य घडवू,' असे उद्गार विद्यार्थ्यांच्या वतीने बेलग्रेड विद्यापीठातील प्रा. रादोमीर साजसिस यांनी काढले. विजयानंतर हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला. या देशात 2024 पासून विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू होती.
शेतकरी, अभिनेते झाले लोकप्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या पुढील नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून विजेत्यांमध्ये अनेक अनामिक चेहरे आहेत. निवडणूक जिंकलेल्यांमध्ये प्राध्यापक, अभिनेते, शेतकरी आदींचा समावेश आहे. निकालातील प्राथमिक अंदाजानुसार, संसदेच्या 250 जागांपैकी 'स्टुडंट लिस्ट - स्टुडंट विन'ला 135 ते 150 जागा मिळण्याची शक्यता आहे. पूर्ण निकाल लागण्याआधीच राष्ट्राध्यक्षांनी पराभव स्वीकारला असून देशाची सत्ता आता तरुणांच्या हाती आली आहे.
मोदींच्या मित्राचं राजकीय भविष्यही पणाला...
दरम्यान, दुसरीकडे इस्रायलच्या 'क्नेसेट' या सर्वोच्च कायदेमंडळाच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) मतदान होत आहे. जवळपास 73 लाख इस्रायली नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. देशभरात 12 हजार 18 मतदान केंद्रे असून तिथे एक लाखांपेक्षा जास्त निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हमासने 7 ऑक्टोबर 2023 नंतर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये प्रथमच मतदान होत असून त्यात पंतप्रधान विन्यामिन नेतान्याहू यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. वनेसेटचे संख्याबळ 120 इतके असून बहुमतासाठी 61 जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 ते रात्री 10 दरम्यान मतदान होईल आणि रात्री उशिरा प्राथमिक कल हाती येतील. गुरुवारपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन संपूर्ण निकाल स्पष्ट होतील, अशी अपेक्षा आहे. निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या विविध जनमत चाचण्यांमध्ये नेतान्याहू यांचा लिकुड पक्ष पिछाडीवर असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. नेतान्याहू हे पंतप्रधान मोदींचे मित्र असून आता या निडणुकीमध्ये नेतान्याहू यांचा विजय होतो की त्यांना घरी बसावं लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.