जगातील सर्वात मोठ्या ओटीटी कंपनीतील कर्मचारी कपात होणार, तब्बल 1 हजार जणांच्या नोकऱ्या जाणार
जगातील सर्वात मोठे ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयटी कंपन्यांमध्ये नोकरकपातीचे संकट कायम आहे. 2026मध्ये प्रमुख कंपन्यांनी मोठी नोकरकपात केली आहे. आता या मोठ्या कंपन्यांच्या यादीत जगातील सर्वात मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सचे नावदेखील समोर आले आहे. नेटफ्लिकसदेखील कर्मचारी कपात करणार करणार असल्याचे समोर आले आहे. कंपनीने एकूण कर्मचाऱ्यांपैकी 6 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकणार आहेत. यात साधारणपणे एक हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. 2022नंतरची सर्वात मोठी कर्मचारी कपात असणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नोकरकपातीचा सर्वात जास्त परिणाम प्रोडक्ट, टेक्नोलॉजी, कायदेशीर तज्ज्ञ आणि एचआर डिपार्टमेंटवर होणार आहे. नेटफ्लिक्स कंपनीत मागील वर्षापर्यंत साधारणपणे 16 हजार कर्मचारी होते.
कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या सूचना
Varietyने दिलेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सचे को-सीईओ टेड सारंडोस आणि ग्रेग पीटर्स यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलच्या माध्यमातून या निर्णयाची माहिती दिली आहे. ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे की, कंपनीसाठी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेणे खूप कठिण होते. कंपनी नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे.
कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सचा व्यवसाय मजबूत आहे आणि कंपनी या वर्षासाठीची आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहे. कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि आपल्या सेवा सुधारण्यासाठी मदत करणाऱ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवेल.
कर्मचारी कपातीचा निर्णय का घेण्यात आला?
नेटफ्लिक्सला यूट्यूब आणि टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्म्सकडून तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. या प्लॅटफॉर्मवर बराचसा कंटेंट विनामूल्य उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रेक्षकांचा वेळ विभागला जातो. यामुळे नेटफ्लिक्ससाठी प्रेक्षकांना टिकवून ठेवणे आव्हानात्मक बनले आहे. कंपनीला आता केवळ सबस्क्रिप्शनच्या महसुलावर अवलंबून राहायचे नाही. यासाठी, ती जाहिरात, लाइव्ह प्रोग्रामिंग आणि गेमिंग यांसारख्या क्षेत्रांमध्येही आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
नेटफ्लिक्सने यापूर्वी 2022 मध्ये अंदाजे 450 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. तेव्हापासून झालेली ही सर्वात मोठी कपात आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे जागतिक तंत्रज्ञान आणि मनोरंजन क्षेत्रातील नोकऱ्या जाण्याच्या चिंतेत वाढ होऊ शकते.