सोनं घ्यायचा विचार करत असाल तर पुढले 15 दिवस फार महत्त्वाचे! 4 डिसेंबर, 9 डिसेंबरला नेमकं काय होणार? समजून घ्या
भारतातील सोन्याचे दर हे चर्चेत असतानाच पुढील 15 दिवस फारच महत्त्वाचे असणार आहे. पुढील 15 दिवसांमध्ये सोन्याचे दर वाढणार की पडणार हे निश्चित होईल असं सांगितलं जातंय. असं काय होणार आहे पुढल्या 15 दिवसांमध्ये जाणून घेऊयात...
सोन्याचे दर हे भारतासारख्या देशामध्ये कायमच चर्चेत असतात. दिवाळीपासून सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं दिसून येत आहे. मात्र सोन्याचे दर हे अप्रत्यक्षपणे भारताच्या बाहेरच निश्चित होतात हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. सोन्याचे दर कमी झाल्याने सोन्यात गुंतवणूक करण्याकडे ओढ लागल्याचं चित्र दिसत आहे. मात्र सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असलेल्यांसाठी पुढील 15 दिवस म्हणजेच 9 डिसेंबरपर्यंतचा काळ अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या 15 दिवसांमध्ये नेमकं काय होणार आहे समजून घेऊयात...
कोणता निर्णय झालाय?
9 डिसेंबरपर्यंत तीन महत्त्वाच्या घडामोडी सोन्याच्या दर निश्चित करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यापैकी एका निर्णय झाला आहे. अमेरिकेतील 'पर्सनल कन्झम्प्शन एक्स्पेंडिचर' महागाईचे आकडे जाहीर झाले आहेत. हा अमेरिकन मध्यवर्ती बँकेचा महागाई मोजण्याचा सर्वात महत्त्वाचा निकष मानला जातो. हा अहवाल काल 25 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाला असून, हा महागाई दर 3.8% नोंदवला गेला आहे. हा दर सप्टेंबरमधील 3.7% पेक्षा किंचित जास्त असून बाजार विश्लेषकांच्या अंदाजाप्रमाणेच आहे. याचाच अर्थ महागाई थोडी वाढली आहे. अमेरिकेत महागाई वाढल्याने व्याजदर जास्त काळ चढे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फेडरल रिझर्व्हची कठोर भूमिकेमुळे जागतिक शेअर बाजार, डॉलरचा विनिमय दर आणि सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव येऊ शकतो.
4 डिसेंबर महत्त्वाची तारीख
आता सर्वांची नजर 4 डिसेंबरकडे लागली आहे. या दिवशी अमेरिकेचा रोजगार अहवाल प्रसिद्ध होणार आहे. अमेरिकेतील नोकऱ्या आणि बेरोजगारीचे ताजे आकडे समोर येतील. यावरून अमेरिकन अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती स्पष्ट होईल. याचाही सोन्याच्या दरांवर परिणाम होणार आहे.
9 डिसेंबरला सर्वात महत्त्वाचा निर्णय
तसेच 9 डिसेंबर रोजी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराचा निर्णय होणार आहे. 9 तारखेला अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक होणार आहे. या बैठकीत व्याजदराबाबत घेतला जाणारा निर्णय थेट डॉलरचे मूल्य आणि सोन्याच्या किमतींवर परिणाम करेल. याचाच अर्थ असा की 25 नोव्हेंबरपासून 16 दिवस म्हणजेच 9 डिसेंबरपर्यंतचा हा टप्पा सोन्याचे दर वाढणार की पडणार हे निश्चित करण्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे.
बाजारावर कसा परिणाम होऊ शकतो?
व्याजदर कपातीचे संकेत मिळाल्यास सोन्याचे दर वाढू शकतात. म्हणजेच जर महागाई आणि रोजगाराचे आकडे कमकुवत आले आणि फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी केले, तर डॉलर कमकुवत होऊन सोन्याच्या दरात तेजी येऊ शकते. व्याजदर स्थिर किंवा जैसे थे राहिल्यास. सध्या सोन्याच्या दरात मोठी घसरण आणि प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळत आहे. जर फेडरल रिझर्व्हने व्याजदराबाबत कठोर भूमिका कायम ठेवली, तर सोन्यावर आणखी दबाव निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.