सौदीमध्ये विमानतळावर झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू, एका भारतीयाचा समावेश, 8 जखमी, दुतावासाने दिलं अपडेट
सौदी अरेबियातील दम्माम विमानतळावर काल रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात दोन जण ठार झाले, तर आठ जण जखमी झाले.
सौदी अरेबियाच्या दम्माम विमानतळावर झालेल्या हल्ल्यात दोन जण ठार, तर आठ जण जखमी झाले आहेत. रात्री उशिरा हा हल्ला झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने गुरुवारी दिली. येमेनमधील हुथी बंडखोरांकडून होणारे हल्ले तीव्र होत असताना ही घटना घडली आहे. बुधवारी झालेल्या या हल्ल्यातील मृतांमध्ये एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. तसंच दुसरी व्यक्ती सौदी नागरिक आहे असे नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने निवेदनात म्हटले आहे. दरम्यान या हल्ल्यात विमानतळाचे किती नुकसान झाले आहे, याचा आढावा घेतला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दूतावासाने दिलेली माहिती
दूतावासाने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे या हल्ल्याबाबत माहिती दिली. त्यात म्हटले आहे, "सौदी अधिकाऱ्यांनी आम्हाला कळवले आहे की, काल रात्री दम्मम विमानतळावर झालेल्या हल्ल्यात ज्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला, त्यात एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे; तसेच इतर दोन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. आम्ही अधिक माहिती गोळा करत असून बाधित कुटुंबांच्या संपर्कात आहोत. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, तसेच जखमी व्यक्तींच्या लवकर बरे होण्याची कामना करतो."
गेल्या काही आठवड्यांत सौदी अरेबियातील तेल आणि नागरी पायाभूत सुविधांवर हुथी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रियाधला आपला मुख्य विमानतळ बंद करावे लागले असून, एक मोठी गुंतवणूक परिषदही पुढे ढकलावी लागली आहे.
एएफपीने अधिकृत आकडेवारीच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात सौदी अरेबियातील विमानतळांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये एकूण 22 जण ठार झाले आहेत. हुथी बंडखोरांनी लावलेल्या सागरी नाकेबंदीमुळे, कच्च्या तेलाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियातून होणारी तेल वाहतूकही धोक्यात आली आहे.
येमेनच्या गृहयुद्धातील अनेक वर्षांपासूनचा युद्धविराम जुलैमध्ये संपुष्टात आल्यानंतर हुथींनी हे हल्ले केले आहेत. या युद्धात इराण-समर्थित गट सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने पाठिंबा दिलेल्या सरकारशी लढत आहे. हुथींनी सौदी अरेबियाची सागरी नाकेबंदी जाहीर केली आणि त्यांची जहाजे, प्रदेश व तेल सुविधांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांनी एक मोठा हल्ला चढवला, ज्यामध्ये त्यांनी तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यालगतचा सरकारच्या ताब्यातील प्रदेश ताब्यात घेतला. याला प्रत्युत्तर म्हणून, सौदी हवाई दलाने हुथींच्या नियंत्रणाखालील भागांना वारंवार लक्ष्य केले आहे, ज्यात गरीब येमेनच्या मोठ्या भागाचा समावेश आहे.