SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

जगातील एकमेव तरंगणारं राष्ट्रीय उद्यान भारतात! जाणून घ्या या अनोख्या ठिकाणाविषयी

जर तुम्हाला तरंगत्या उद्यानाचा अनुभव घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला भारताबाहेर जाण्याची गरज नाही. हे उद्यान भारतात नेमकं कुठे आहे हे जाणून घ्या.

Written By tejashree gaikwad
Published: Oct 07, 2026, 02:09 PM IST | Updated: Oct 07, 2026, 02:13 PM IST
Image Credit: Worlds only floating national park ( Incredible India )
Join


तुम्ही आतापर्यंत अनेक राष्ट्रीय उद्यानं पाहिली असतील. पण पाण्यावरचं राष्ट्रीय उद्यान पाहिलं आहे का? भारतात एक असं अनोखं ठिकाण आहे, जिथे चक्क पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतींच्या बेटांवर वन्यजीवांचा अधिवास आहे. आजूबाजूला पाणी, त्यावर तरंगणारी हिरवाई आणि त्यामध्ये मुक्तपणे वावरणारे प्राणी, हे दृश्य एखाद्या सिनेमासारखं वाटतं. हे अनोखं राष्ट्रीय उद्यान म्हणजे केइबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान, जे मणिपूरमधील प्रसिद्ध लोकटक तलावावर वसलेलं आहे. निसर्ग आणि वन्यजीवांचा असा अनोखा मिलाफ पाहण्यासाठी हे ठिकाण एकदा तरी नक्की अनुभवायला हवं.

लोकटक तलावावर वसलेलं अनोखं राष्ट्रीय उद्यान

मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात लोकटक तलावावर केइबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान पसरलेलं आहे. हे जगातील एकमेव तरंगणारं राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखलं जातं. इंफाळपासून हे ठिकाण साधारण ५० ते ५५ किलोमीटर अंतरावर आहे. या राष्ट्रीय उद्यानाची सर्वात मोठी खासियत म्हणजे ‘फुमडी’. लोकटक तलावात आढळणाऱ्या या तरंगत्या वनस्पतींच्या मोठ्या रचना म्हणजेच फुमडी. वनस्पती, माती आणि साचलेला सेंद्रिय पदार्थ यांच्या थरांपासून कालांतराने या नैसर्गिक तरंगत्या रचना तयार झाल्या आहेत.

या फुमडींमुळे संपूर्ण उद्यान पाण्यावर तरंगत असल्यासारखं दिसतं. त्यामुळे इथला निसर्ग इतर कोणत्याही राष्ट्रीय उद्यानापेक्षा पूर्णपणे वेगळा भासतो.

दुर्मिळ संगाई हरणाचं सुरक्षित घर

केइबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यानाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं आढळणारा संगाई हरण. मणिपूरमध्ये नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या या हरणाला ब्राऊ-अँटलेर्ड डिअर म्हणूनही ओळखलं जातं. याशिवाय उद्यानात हॉग डिअर, ऊदबिलाव आणि विविध प्रकारचे जलपक्षी पाहायला मिळतात. विशेषतः नोव्हेंबर ते मार्चदरम्यान अनेक स्थलांतरित पक्षी या परिसरात येतात. त्यामुळे पक्षीनिरीक्षणाची आवड असणाऱ्यांसाठीही हे ठिकाण खास आहे.

लोकटक तलावाचीही आहे वेगळी ओळख

लोकटक तलाव हा ईशान्य भारतातील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा तलाव मानला जातो. तलावावर तरंगणाऱ्या फुमडी हीच त्याची सर्वात खास ओळख आहे.
या फुमडींवर काही स्थानिक लोक पारंपरिक पद्धतीने वास्तव्यही करतात. तलावाच्या पाण्यावर उभारलेल्या छोट्या तरंगत्या झोपड्या, ज्यांना ‘फुमसांग’ म्हटलं जातं, हा या परिसराच्या जीवनशैलीचा एक वेगळाच भाग आहे. तलावाचा निळाशार विस्तार, त्यावर तरंगणाऱ्या हिरव्या रचना आणि आसपासचे डोंगर यामुळे इथलं दृश्य अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणारं असतं.

बोटिंगपासून निसर्गभ्रमंतीपर्यंत अनेक अनुभव

लोकटक तलावाचा सुंदर नजारा पाहण्यासाठी सेंद्रा हे एक उत्तम ठिकाण मानलं जातं. इथून तलावाचा विस्तीर्ण परिसर पाहता येतो. तलावात बोटिंगसारख्या जलक्रीडांचाही आनंद घेता येतो. केइबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यानाला भेट देताना सकाळच्या वेळी कॅनो राइडचा अनुभव घेणं विशेष संस्मरणीय ठरू शकतं. पाण्यावरून प्रवास करताना आजूबाजूला दिसणारी तरंगती हिरवाई आणि वन्यजीवांचा अधिवास हा अनुभव नक्कीच वेगळा असेल.

एकदा तरी अनुभवायला हवं हे अनोखं ठिकाण

पाण्यावर तरंगणारं राष्ट्रीय उद्यान ही कल्पनाच कदाचित सुरुवातीला अविश्वसनीय वाटेल. मात्र केइबुल लामजाओ हे एक वास्तविक आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आर्द्रभूमी परिसंस्था आहे. निसर्ग, वन्यजीव आणि स्थानिक जीवनशैली यांचा असा अनोखा संगम भारतात क्वचितच पाहायला मिळतो. त्यामुळे नेहमीच्या पर्यटनस्थळांपेक्षा काहीतरी वेगळं अनुभवायचं असेल, तर मणिपूरमधील केइबुल लामजाओ आणि लोकटक तलाव तुमच्या ट्रॅव्हल बकेट लिस्टमध्ये नक्की असायला हवेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.

ZEENEWS TRENDING STORIES